भारत, अमेरिका आणि जपानचा नौदल सराव आजपासून सुरू

वृत्तसंस्था
सोमवार, 10 जुलै 2017

या सरावामध्ये अमेरिकेच्या पाच युद्धनौका, पोसेडॉन लढाऊ विमान आणि एक पाणबुडी यांनी, तर जपानच्या दोन युद्धनौकांनी सहभाग घेतला आहे. भारतातर्फे आयएनएस जलाश्‍व आणि आयएनएस विक्रमादित्य या युद्धनौका सरावात भाग घेतील

चेन्नई - लष्करी संबंध अधिक दृढ करण्याच्या हेतूने भारत, अमेरिका आणि जपान या तीन देशांचा "मलबार 2017' हा नौदल सराव आजपासून (सोमवार) सुरू झाला.

हा नौदल सराव बंगालच्या उपसागरात होत आहे. या सरावामध्ये अमेरिकेच्या पाच युद्धनौका, पोसेडॉन लढाऊ विमान आणि एक पाणबुडी यांनी, तर जपानच्या दोन युद्धनौकांनी सहभाग घेतला आहे. भारतातर्फे आयएनएस जलाश्‍व आणि आयएनएस विक्रमादित्य या युद्धनौका सरावात भाग घेतील.

अमेरिका, भारत आणि जपान या तीन देशांचा हा 21 वा संयुक्त सराव आहे. एकमेकांच्या सहकार्याने टेहेळणी, बचाव आणि हल्ला यांचा सराव या वेळी केला जाणार आहे. याशिवाय, वैद्यकीय मदत, शस्त्रसाठा पुरविणे, हेलिकॉप्टर कारवाई यांचा सरावही केला जाणार आहे.