मनमोहनच जाणोत रेनकोट घालून अंघोळीची कला!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

तुम्ही मर्यादा ओलांडाल तर ऐकण्याचीही तयारी ठेवा. पराजय स्वीकारायचाच नाही हे किती काळ चालणार?
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

नवी दिल्ली : "माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचा गेल्या 35 वर्षांत म्हणजे स्वतंत्र भारतातील निम्मा कालावधी देशाच्या आर्थिक धोरणांशी निकटचा व निर्णायक संबंध आला. या देशाच्या अर्थकारणावर एकाच व्यक्तीचा इतका दीर्घकाळ दबदबा असण्याचे हे एकमेव उदाहरण आहे. या काळात इतके गैरव्यवहार झाले; पण डॉ. मनमोहनसिंग यांना एकही डाग लागला नाही. बाथरूममध्ये रेनकोट घालून स्नान करणे ही कला तर डॉक्‍टरसाहेबच जाणोत. आम्ही राजकारण्यांनी ती कला त्यांच्यापासून शिकायला पाहिजे,' असा तडाखा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत डॉ. मनमोहनसिंग यांना उद्देशून आज लगावला. या जबरदस्त शाब्दिक तडाख्याने पुरते घायाळ झालेल्या कॉंग्रेस सदस्यांनी त्यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ सभात्यागाचे अस्त्र उपसले.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावावरील चर्चेला उत्तर देताना मोदी यांनी आज नोटाबंदीला राजकारणापासून दूर ठेवण्याचे आवाहन राजकीय पक्षांना केले. नोटाबंदीनंतर संसदेचे कामकाज तब्बल एक अधिवेशनभर ठप्प करणाऱ्या, पंतप्रधानांना वेलमध्ये उतरून तऱ्हेतऱ्हेच्या उपमा देणाऱ्या कॉंग्रेसचे सारे हिशेब चुकते करण्याच्या उद्देशानेच मोदी आज सभागृहात आल्याचे स्पष्ट दिसत होते. "निर्णयाची लूट,' 'अपयशाचे स्मारक' अशी संभावना करणारे डॉ. मनमोहनसिंग हेही मोदींच्या तडाख्यातून सुटले नाहीत. यानंतर गोंधळ घालणाऱ्या व सभात्याग करणाऱ्या कॉंग्रेसला उद्देशून मोदी म्हणाले, "नोटाबंदीतून सरकारने कोणती व कोणाची लूट केली, राज्यघटनेचे उल्लंघन कोठे केले, हे सांगा. तुम्ही मर्यादा ओलांडाल तर ऐकण्याचीही तयारी ठेवा. पराजय स्वीकारायचाच नाही हे किती काळ चालणार?'' मोदी यांनी पी. चिदंबरम यांनाही तडाखा लगावताना माजी गव्हर्नर सुब्बाराव यांच्या पुस्तकाचा उल्लेख करून, चिदंबरम यांनी पतधोरणाच्या रिझर्व्ह बॅंकेच्या अधिकारांत उघड हस्तक्षेप केल्याचा या पुस्तकातील प्रसंग उधृत केला.

नोटाबंदीवरून वांछू समितीचा अहवाल, माजी अर्थमंत्री यशवंतराव चव्हाण यांची अनुकूलता व तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे त्यावरील नकारार्थी उत्तर, या माधव गोडबोले यांच्या पुस्तकातील घटनेचा मोदींनी आज पुन्हा उल्लेख केला. यावर गदारोळ करणाऱ्या कॉंग्रेस सदस्यांना ते म्हणाले, की गोडबोले यांचे पुस्तक प्रकाशित झाले तेव्हा तुम्ही झोपला होतात का? मी तुमच्या जागी असतो तर गोडबोले यांच्यावर त्या वेळीच खटला भरला असता.

अभिभाषणातील अन्य मुद्द्यांना स्पर्श करताना मोदींनी आज मुख्यत्वे नोटाबंदी व स्वच्छ भारत याच मुद्द्यांवर सुमारे तासाभराचे भाषण फिरवत ठेवले. कॉंग्रेसला सभात्यागात अन्य विरोधकांनी साथ दिली नाही. मात्र दुरुस्त्या मतदानाला आल्यावर त्यावर बोलू देण्याच्या मुद्द्यावरून डावे पक्ष, जेडीयू, तृणमूल कॉंग्रेससह अन्य विरोधकांनी सभात्याग केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पहिल्या तीन रांगेतील एकमेव विरोधी नेते अखेरपर्यंत सभागृहात थांबून होते.

इतका कठोर निर्णय असेल तर तो समजण्यासाठीही काही काळ जावा लागतो, असे सांगून मोदी म्हणाले, की नोटाबंदीनंतर सरकारच्या पाठीशी राहिलेले जनताजनार्दन व विरोध करणारे राजकीय नेते यांच्यातील उभा भेद जगासमोर आला इतके हे नेते जगापासून तुटलेले आहेत. नोटाबंदीसारख्या विषयावर नकारात्मक मानसिकता आपण ठेवली तर पुढे जाऊ शकणार नाही. काळा पैसा, बनावट चलन यांसारख्या पर्यायी अर्थव्यवस्थेतून गरिबांचे व मध्यमवर्गीयांचे सर्वाधिक नुकसान होते. पेपरलेस, प्रिमायसेसलेस बॅंकिंगकडे सारे जग जात असेल, तर भारताला मागे राहण्याचा काही हक्क नाही. बॅंकांपर्यंत पोचलेल्या खोट्या नोटांची चर्चा होते; पण कधी बॅंकांत जमाच न होणाऱ्या प्रचंड खोट्या नोटांची गणती याच्या पलीकडे आहे.

देश

मुंबई : मला मुलाला जन्म घालण्याची कोणतीही हौस नाही. पण, आता मुलीला जन्म देताना भीती वाटते, अशी खळबळजनक याचना टीव्ही अभिनेत्री...

01.30 PM

पलक्कड : केरळमधील पलक्कड जिल्ह्यात स्वातंत्र्यदिनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते...

12.09 PM

लखनौ : "ईदचा नमाज रस्त्यांवर पढण्यापासून रोखू शकत नाही, तर पोलिस ठाण्यांत, पोलिस लाईनमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यावर...

10.45 AM