बंगालच्या उपसागराच्या तळाशी सापडला मिथेनचा मोठा साठा 

Meeting
Meeting

पणजी (गोवा) : कृष्णा गोदावरीचे खोरे आणि बंगालच्या उपसागराच्या तळाशी मिथेन वायूचे मोठे साठे सापडल्याची घोषणा दोनापावल येथील राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेने आज येथे केली. हे वायूचे साठे समुद्र तळाशी केवळ तीन मीटर खोलीवर असल्याने वायू बुडबुड्यांच्या स्वरुपात सातशे मीटर खोलवरपर्यंत वर येत असल्याचे या संस्थेच्या संशोधकांना आढळून आले आहे. 

संस्थेचे संचालक डॉ. सुनीलकुमार सिंह यांनी ही माहिती आज दिली. 12 जानेवारी ते 6 फेब्रुवारीदरम्यान ही प्रत्यक्ष पाहणी मोहिम राबविण्यात आली होती. समुद्राच्या पाण्याच्या अंतरंगाचे छायाचित्रण करण्याचे तंत्रज्ञान एनआयओने विकसित केले आहे. त्या आधारे घेतलेल्या छायाचित्रांत सातशे मीटर खोलीवर काही बुडबुडे दिसले. त्या बुडबुड्यांच्या स्त्रोतांचा शोध घेताना मिथेन वायूचा शोध लागला आहे. उपसागराच्या आणि खोऱ्यातील तळातील मातीचे पृथ्थकरण जहाजावर केल्यावर मिथेनचा मोठा साठा त्या भागात असल्याचे दिसून आले. हा साठा समुद्राच्या तळाशी केवळ तीन मीटरवर असल्याने तो बाहेर काढण्यासाठी नव्याने तंत्रज्ञान विकसित करावे लागणार आहे. जपान, चीनसारखे देश या तंत्रज्ञानावर काम करत आहेत भारताकडे तसे तंत्रज्ञान सध्या नाही मात्र ते विकसित केले जाऊ शकते. 

ते म्हणाले, समुद्राच्या तळाशी भिन्न वातावरणात, भिन्न पाण्याच्या दाबाखाली जगणारी वेगळीच जीवसृष्टी आढळली आहे. यातील काही जीवजंतू हे मिथेन वायूच्या निर्मितीला कारण असू शकतात. त्यावर यापुढे संशोधन केले जाणार आहे. तेथे खेकड्यांच्या आकाराचे तीन इंच आकाराचे काही प्राणी आढळले, स्टार फीशसारखा प्राणी तर गांडुळसदृश्‍य प्राणीही आढळले. त्यातील काही प्राणी जहाजावर आणले गेल्यानंतरही वातावरण व दाबाचा बदल सहन करत जीवंत होते, अशी माहिती त्यांनी दिली. 

संस्थेने पवन देवांगण आणि अनिदा मुजूमदार यांच्या नेतृत्वाखाली ही मोहिम राबविली होती. या मोहिमेदरम्यान समुद्राच्या तळाची माती जी एरव्ही हिरवट रंगाची असते ती काळी आढळली. त्याचे कारण म्हणजे या मातीत आयर्न मोनो सल्फाईटचे प्रमाण नेहमीच्या प्रमाणापेक्षा हजारपट जास्त आहे. त्याची कारणेही शोधावी लागणार आहेत. या साऱ्या जीवसृष्टीचा उपयोग औषध निर्मिती उद्योगासाठी होण्याची शक्‍यता आहे. मात्र त्यासाठी सखोल संशोधनाची गरज आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले. समुद्राच्या तळाशी दडलेल्या वायूचा 10 टक्के जरी उपयोग झाला तरी 100 वर्षांची उर्जेची गरज भागू शकेल असेही त्यांनी एका प्रश्‍नावर सांगितले. 

यापुढील संशोधनासाठी रिमोटने चालणारे स्वयंचलीत वाहन समुद्राच्या तळाशी पाठविण्यात येणार आहे. त्याशिवाय याच तंत्रज्ञानाने अन्य कोणत्या ठिकाणी वायूचे साठे आहेत का याची माहिती संकलीत केली जाईल अशी माहिती दोनापावल येथील राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. सुनीलकुमार सिंह यांनी 
दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com