'जीएसटी'च्या बळावर सूरत जिंकण्याचे काँग्रेसचे स्वप्न भंगले! 

File photo of Narendra Modi
File photo of Narendra Modi

अहमदाबाद : देशातील आर्थिक सुधारणांच्या कार्यक्रमातील महत्त्वाचा टप्पा म्हणून पाहिल्या जात असलेल्या वस्तू व सेवा करावरून (जीएसटी) देशभरातील विरोधी पक्षांनी काहूर उठविले होते. त्यामुळे यंदाच्या व्यापारी समाजाचे प्राबल्य असलेल्या गुजरात निवडणुकीमध्ये सत्ताधारी भाजपला अडचणीला सामोरे जावे लागेल, अशीच अटकळ बांधण्यात येत होती. पण व्यापारासाठी प्रसिद्ध असलेल्या सूरतमधील बहुतांश जागांवर भाजपनेच बाजी मारत या चर्चा निरर्थक असल्याचे दाखवून दिले. 

'जीएसटी' हा गुजरातच्या प्रचारातील, विशेषत: सूरतमधील प्रचारातील कळीचा मुद्दा होता. या भागामध्ये पटेल समाजाच्या मतदारांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळे 'जीएसटी' आणि पाटीदार आरक्षणाचे आंदोलन या दोन्ही घटकांचा फटका भाजपला बसेल, असे राजकीय तज्ज्ञांचे निरीक्षण होते. 'जीएसटी'मुळे व्यापारावर परिणाम झाल्याचे आकडे समोर येत असल्याने निवडणुकीमध्ये त्याचा फायदा काँग्रेसला होईल, असाही अंदाज होता. 

याच नाराजीचा फायदा घेण्याचा काँग्रेसने पुरेपूर प्रयत्न केला. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरातमधील प्रचारामध्ये सातत्याने 'जीएसटी'चा उल्लेख 'गब्बरसिंग टॅक्‍स' असा करत त्याची खिल्ली उडविली होती. तरीही प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये काँग्रेसला या प्रचारातून लाभ झालेला दिसत नाही. 

'व्यापारी वर्गाच्या 'जीएसटी'बद्दल ज्या काही तक्रारी होत्या, त्या सर्वांचे निराकरण करण्याचे सरकारचे धोरण आहे. दर महिन्याला 'जीसटी कौन्सिल'ची बैठक होत असते. देशभरातून येणाऱ्या प्रतिक्रियांचा विचार करून त्यामध्ये बदल केले जातात. सूरतमध्ये आम्ही सर्व जागा जिंकूच' असे विधान भाजपचे राष्ट्रीय सचिव आणि गुजरातचे प्रभारी भूपेंद्र यादव यांनी गेल्या महिन्यात सांगितले होते. हा दावा सूरतमध्ये खरा ठरताना दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com