गुजरातमध्ये भाजपची तिसरी यादी जाहीर 

गुजरातमध्ये भाजपची तिसरी यादी जाहीर 

नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली तिसरी यादी जाहीर केली आहे. माजी मंत्री सौरभ पटेल आणि भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आर. सी. फालदू यांची नावे आज जाहीर केलेल्या 28 उमेदवारांच्या यादीत आहेत. भाजपने आतापर्यंत 182 जागांपैकी 134 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. 

आनंदीबेन पटेल यांच्या जागी विजय रुपानी यांनी गेल्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सौरभ पटेल यांना नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले नव्हते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळण्याबाबत साशंकता होती. मात्र, पटेल समुदायाला आपल्या बाजूने कायम ठेवण्याचा प्रयत्न करत असलेल्या भाजपने सौरभ पटेल यांना बोटाड मतदारसंघातून तिकीट दिले आहे. आर. सी. फालदू यांना दक्षिण जामनगरमधून तिकीट दिले आहे. ही जागा सध्याच्या आमदार आणि माजी मंत्री वसुबेन त्रिवेदी यांच्याकडे होती. भाजपने त्रिवेदी यांच्याबरोबरच 16 विद्यमान आमदारांना यादीतून वगळले आहे. मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी आज राजकोट मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. या वेळी त्यांनी कॉंग्रेसवर जोरदार टीका केली. 

कॉंग्रेसकडून पहिली यादी 
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची तिसरी यादी जाहीर झाली असताना कॉंग्रेसनेही उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत 77 जणांची नावे असून, पटेल समुदायातील 23 जणांचा यात समावेश आहे. याशिवाय कोळी समाजाच्या 12, इतर मागासवर्गीय समाजाच्या आठ आणि दलित समाजाच्या सात जणांनाही यादीत स्थान मिळाले आहे. या यादीत 14 विद्यमान आमदार आहेत. दरम्यान, कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे 24 नोव्हेंबरला गुजरातमध्ये कॉंग्रेसच्या प्रचारासाठी येण्याची दाट शक्‍यता कॉंग्रेस नेत्यांनी व्यक्त केली आहे. 

पाटीदार नेते कॉंग्रेसवर नाराज 
कॉंग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अधिक प्रतिनिधित्व मिळण्याची अपेक्षा असलेल्या पाटीदार अनामत आंदोलन समितीला कॉंग्रेसच्या पहिल्या यादीत दोनच जागा मिळाल्या आहेत. यामुळे पाटीदार नेत्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली असून, अधिक जागा मिळण्याची मागणी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com