हेल्मेट न घातल्यामुळे चक्क कारचालकालाच दंड !

Traffic Cop
Traffic Cop

जयपूर : वाहतूक पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी अनेकदा आपण वाहतुकीचे नियम पाळण्याचा प्रयत्न करतो. वाहतूक पोलिसांच्या कारवाईमुळे वाहनचालक आणि पोलिसांमध्ये अनेकदा शाब्दिक बाचाबाची होत असते. हेल्मेट न घातल्याने दुचाकी चालकांना पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागत असते. मात्र, हेल्मेट न घातल्याने चक्क एका कारचालकालाच दंड आकारण्यात आल्याचा अनोखा प्रकार राजस्थानमधील भरतपूरमध्ये घडला.

भरतपूरमधील खरेरा गावात राहणाऱ्या विष्णू शर्मा या 23 वर्षीय तरूणाला कार चालवताना हेल्मेट वापरले नाही म्हणून दंड आकारण्यात आला. विष्णू शर्मा 1 डिसेंबर रोजी आगराहून गावी परतत असताना एका वाहतूक पोलिसाने त्याला थांबवले आणि गाडी चालवताना हेल्मेट वापरले नाही, म्हणून त्याच्याकडून 200 रूपयांचा दंड आकारला. तसे त्या वाहतूक पोलिसाने चलनमध्ये नमूदही केले. या अनोख्या कारवाईमुळे विष्णू अचंबित झाला. त्यानंतर त्याने याचा निषेध म्हणून व्हॅन चालवतानाही हेल्मेट वापरायला सुरवात केली आहे.  

"मी माझ्या चारचाकी वाहनाने गावी परतत होतो. त्यावेळी मी वाहनपरवाना, वाहनाची विमा कागदपत्रे, नोंदणी कागदपत्रे सोबत ठेवली होती. तसेच कार चालवताना मी सीट बेल्टही घातले होते. तरीदेखील माझ्याकडून 200 रुपये दंड घेण्यात आला आणि दिलेल्या पावतीमध्ये हेल्मेट वापरले नसल्याचे नमूद केले होते'', असे विष्णू शर्मा याने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com