नोएडामध्ये 7 वर्षीय बालिकेवर पोलिस कर्मचाऱ्याचा बलात्कार

वृत्तसंस्था
गुरुवार, 11 जानेवारी 2018

'पीडित बालिकेला नोएडाच्या जिल्हा रूग्णालयातील सेक्टर 30 मध्ये वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. याबाबतचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल''

- अखिलेश प्रधान , सूरजपूर पोलिस अधिकारी

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश पोलिस दलातील एका 45 वर्षीय पोलिस शिपायाने सात वर्षीय बालिकेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर जमावाने त्या पोलिस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. 

सुभाष सिंग असे त्या पोलिस शिपायाचे नाव असून, तो गौतम बुद्धनगर येथे विक्रीकर विभागात सेवेत आहे. पीडित बालिका सुरजपूर येथे राहत आहे. ती तिच्या घरासमोरील मोकळ्या जागेत खेळत होती. त्यावेळी तेथे कोणीही नसल्याने याचा फायदा घेत सुभाष सिंगने तिला ओढून नेत तिच्यावर बलात्कार केला. ही घटना बुधवारी दुपारी 3 च्या सुमारास घडली. जेव्हा हा प्रकार सुरु होता, तेव्हा त्या बालिकेने आरडाओरड सुरु केली. बालिकेचा आवाज ऐकल्यानंतर परिसरातील लोक त्या ठिकाणी जमा झाले. मात्र, त्याने तेथून पळ काढला.

मध्यरात्री चारच्या सुमारास सिंग आपल्या घरी पुन्हा आला. त्यावेळी दोन महिला शेजाऱ्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, पण त्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर शंभरहून अधिक लोकांचा समूह तेथे जमला आणि त्यांनी त्याला बेदम मारहाण केली. मारहाण करतेवेळी सुभाष सिंग वर्दीमध्ये होता. त्याला सुमारे दोन तास मारहाण करण्यात आली.

त्यानंतर पोलिसांना याबाबतची माहिती दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी सकाळी 8 च्या सुमारास सुभाष सिंगला अटक केली.

''पीडित बालिकेला नोएडाच्या जिल्हा रूग्णालयातील सेक्टर 30 मध्ये वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. याबाबतचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल'', असे सूरजपूरचे पोलिस अधिकारी अखिलेश प्रधान यांनी सांगितले.  

दरम्यान, पोलिसांनी सिंगविरोधात भारतीय दंडविधान कलम 342, 376 आणि 5/6 बाललैंगिक संरक्षण कायदा (पॉस्को) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: marathi news national crime news Greater Noida Constable rapes 7 year old arrested after mob roughs him up