मधू कोडांना तूर्त दिलासा ; दिल्ली उच्च न्यायालयाकडून निर्णयाला स्थगिती

वृत्तसंस्था
मंगळवार, 2 जानेवारी 2018

कोडांना न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश अनू मल्होत्रा यांनी त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली. कोडा यांना 25 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. यालाही न्यायालयाने स्थगिती दिली आहे. तसेच न्यायालयाने त्यांना पुढील सुनावणी होईपर्यंत जामिन मंजूर केला आहे. मात्र, त्यांना कोणत्याही परिस्थिती देश सोडून जाता येणार नाही, असेही सांगितले आहे.

नवी दिल्ली : कोळसा खाण वाटपात गैरव्यवहार केल्याप्रकरणी तीन वर्षांची शिक्षा सुनावलेल्या झारखंडचे तत्कालीन मुख्यमंत्री मधू कोडा यांना दिल्ली उच्च न्यायालयाने दिलासा दिला. खटला सुरु असलेल्या न्यायालयाने त्यांना तीन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर आज दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना 22 जानेवारीपर्यंत दिलासा देत या निर्णयाला स्थगिती दिली.

कोडांना न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश अनू मल्होत्रा यांनी त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली. कोडा यांना 25 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. यालाही न्यायालयाने स्थगिती दिली आहे. तसेच न्यायालयाने त्यांना पुढील सुनावणी होईपर्यंत जामिन मंजूर केला आहे. मात्र, त्यांना कोणत्याही परिस्थिती देश सोडून जाता येणार नाही, असेही सांगितले आहे.

कोडा यांना 16 डिसेंबर रोजी विशेष न्यायालयाने तीन वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली. कोळसा खाणींच्या वाटपात गैरव्यवहार केल्याप्रकरणी कोडा यांच्यासह माजी कोळसा सचिव एच. सी. गुप्ता यांनाही तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. न्यायालयाने कोडा यांना 25 लाख तर गुप्ता यांना एक लाखांचा दंड ठोठावला.

दरम्यान, न्यायालयाच्या या निर्णयामुळे कोडा यांना तूर्त दिलासा मिळाला आहे.
 
Web Title: marathi news national news Coal scam Delhi high court stays three year jail term of Madhu Koda