राहुल गांधींवरील दोषारोप सिद्ध करण्याची पुढील सुनावणी 23 एप्रिलला

वृत्तसंस्था
बुधवार, 17 जानेवारी 2018

''महात्मा गांधींजींची हत्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच (आरएसएस) घडवून आणली'', असे खळबळजनक वक्तव्य राहुल गांधींनी ६ मार्च २०१४ रोजी पंधराव्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिवंडीत केले होते. त्यांच्या या वक्तव्याने मानहानी झालेल्या आरएसएसचे शहर जिल्हा कार्यवाहक राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती. 

नवी दिल्ली : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात सुरु असलेल्या दाव्याच्या सुनावणीसाठी भिवंडी न्यायालयात आज राहुल गांधी गैरहजर राहिल्याने त्यांच्या वतीने त्यांचे वकील नारायण अय्यर यांनी उपस्थित लावली. आता त्यांच्यावरील दोषारोप सिद्ध करण्याची सुनावणी येत्या 23 एप्रिल रोजी होणार आहे.

राहुल गांधी हे काँग्रेस पक्षाच्या कामात व्यस्त असल्यामुळे आज सुनावणीसाठी येणार नसल्याबाबतचा विनंती अर्ज न्यायाधीश एल. एम. पठाण यांच्या न्यायालयात करण्यात आली. न्यायाधीश एल. एम. पठाण यांनी विनंती अर्ज मान्य केला. त्यामुळे राहुल गांधींवर दोषारोप सिद्ध करण्याची पुढील सुनावणी 23 एप्रिल रोजी केली जाणार आहे. विशेष म्हणजे न्यायाधीश सुधीर बर्डे यांच्या न्यायालयात सुनावणी होती. मात्र, आज तेही रजेवर होते.  

''महात्मा गांधींजींची हत्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच (आरएसएस) घडवून आणली'', असे खळबळजनक वक्तव्य राहुल गांधींनी ६ मार्च २०१४ रोजी पंधराव्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिवंडीत केले होते. त्यांच्या या वक्तव्याने मानहानी झालेल्या आरएसएसचे शहर जिल्हा कार्यवाहक राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती. 

न्यायालयाकडून आरोप निश्चितीसाठी राहुल गांधी यापूर्वी भिवंडी न्यायालयात हजर झाले होते.  त्यावेळी न्यायालयात त्यांच्या वकिलांनी केवल वृत्तपत्राच्या बातमीवरून याचिका दाखल करून गुन्हा नोंदवण्यात आला, अशी बाजू मांडण्यात आली होती. त्यामुळे कायदेशीरपणे गुन्ह्याचे स्वरूप उघड होत नसल्याने संपूर्ण कागदपत्रे उपलब्ध करावीत, अशी मागणीही न्यायालयाकडे करण्यात आली होती.

दरम्यान, राहुल गांधीवर आरोप निश्चितीसाठी लागणारी कागदपत्रे फिर्यादी पक्षाने आरोपी पक्षाला सादर न केल्याने भिवंडी न्यायालयाने फिर्यादी पक्षाने या दाव्यातील संपूर्ण कागदपत्रे सादर करावी, अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार तारीख पे तारीखच सुरु आहे. आजही भिवंडी न्यायालयात राहुल गांधी यांच्यावर दोषारोप सिद्ध करण्यासाठी सुनावणी होती .

मात्र, राहुल गांधी पक्षाच्या कामात व्यस्त असल्यामुळे ते आज न्यायालयात सुनावणीसाठी हजर राहू शकले नसल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिली. त्यामुळे आता या याचिकेवरील पुढील सुनावणी 23 एप्रिल रोजी होणार असल्याचेही वकीलाने सांगितले.

Web Title: Marathi news National news Defamation case Bhiwandi court orders Rahul Gandhi to appear on April 23 2018