चौकीदार झोपले आहेत : सिब्बल 

national News Kapil sibbal PNB Bank Scam
national News Kapil sibbal PNB Bank Scam

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बॅंकेतील (पीएनबी) गैरव्यवहारावरून कॉंग्रेसने मोदी सरकारला चिमटे काढणे सुरू ठेवले असून, "चौकीदार झोपले आहेत आणि चोर पळून गेले आहेत' (चौकीदार सो गया है, चोर खो गया है) अशा शब्दांत माजी मंत्री कपिल सिब्बल यांनी नीरव मोदीच्या पलायनावरून केंद्र सरकारवर तोफ डागली. या गैरव्यवहाराची पूर्ण माहिती असूनही सरकारने काहीही कारवाई केली नाही, असा आरोपही त्यांनी केला. 

"पीएनबी'मध्ये 11,400 कोटी रुपयांचा गैरव्यवहार उघडकीस आल्यापासून कॉंग्रेसने सत्ताधारी भाजपला झोडपण्याची एकही संधी सोडलेली नाही. प्रमुख आरोपी नीरव मोदी आणि मेहुल चोक्‍सी यांच्या चार कंपन्यांना 30 हून अधिक बॅंकांनी 9,906 कोटी रुपयांचे कर्ज दिल्यामुळे हे गैरव्यवहार 21,300 कोटी रुपयांवर पोहोचल्याचा दावा करणाऱ्या कॉंग्रेसने सरकारवर सारे काही माहीत असूनही निष्क्रियतेचा आरोप केला होता. या मालिकेत सिब्बल यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आगपाखड केली. नीरव मोदीने नोटाबंदीच्या काळात किती मालमत्ता खरेदी केली, याची चौकशी झाल्यास नवीन गैरव्यवहार उघडकीस येईल, असे ते म्हणाले.

हिरे आणि मौल्यवान खड्यांचा व्यापार करणाऱ्या नीरव मोदीच्या व्यवसायाचे भांडवली मूल्य 41.66 अब्ज रुपये असून, त्याच्यावर 91 अब्ज रुपयांचे कर्ज आहे. त्यामुळे भांडवली मूल्याच्या दुप्पट कर्ज बॅंकांनी दिलेच कसे, असा प्रश्‍न सिब्बल यांनी केला आणि ही तफावत पाहता गैरव्यवहार होणारच होता, असाही टोला त्यांनी लगावला. 

अर्थमंत्र्यांचे मौन 

सिब्बल म्हणाले, की नीरव मोदीने घेतलेली सर्व अधिकार पत्रे (लेटर ऑफ अंडरस्टॅन्डिंग) 2017 ची असून, त्यांचे पैसे 2018 मध्ये चुकते होणे अपेक्षित होते. हे उघड उघड दिसत असताना, यावर अर्थमंत्री अरुण जेटली मौन बाळगून आहेत आणि सामाजिक न्यायमंत्री, मनुष्यबळ विकासमंत्री उत्तर देत आहेत. कदाचित मनुष्यबळ विकासमंत्र्यांना नीरव मोदीच्या मनुष्यबळ नियंत्रणाच्या कौशल्याचे आकर्षण वाटत असावे, असाही चिमटा सिब्बल यांनी मंत्री प्रकाश जावडेकर यांना काढला.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com