न्यायाधीशांच्या मुद्यावर विचार होणे गरजेचे : यशवंत सिन्हा

वृत्तसंस्था
शनिवार, 13 जानेवारी 2018

''संसदेच्या कामकाजाचा कालावधी कमी होत आहे. त्यामुळे कोणत्याही विषयावर चर्चा होऊ शकत नाही. अशाप्रकारच्या कमी कालावधीत चालणारे संसदचे सत्र कधीही पाहिले नाही''

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या चार वरिष्ठ न्यायाधीशांनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यामध्ये असणारे मतभेद काल (शुक्रवार) उघडपणे मांडले. त्यानंतर माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यावर म्हणाले, की ''न्यायाधीशांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर विचार करणे हे आपले कर्तव्य आहे. लोकांना आपले मत मांडू दिले जात नाही. त्यांना बोलू दिले जात नाही''.

सर्वोच्च न्यायालयातील चार न्यायाधीशांनी काल सर्वोच्च न्यायालयातील कामकाजाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर सिन्हा यांनी सत्ताधारी भाजपला घरचा आहेर दिला. ते म्हणाले, जेव्हा सर्वोच्च न्यायालयतील न्यायाधीश उघडपणे जनतेसमोर मतप्रदर्शन करत असतील, तर हा फक्त सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न कसा होऊ शकतो. हा एक गंभीर मुद्दा आहे. ज्या लोकांना देशाच्या भविष्य आणि लोकशाहीची काळजी आहे. त्यांनी हा मुद्दा उपस्थित करायला हवा. लोकं भीतीपोटी बोलू शकत नाहीत, असेही ते म्हणाले.

तसेच ते पुढे म्हणाले, ''संसदेच्या कामकाजाचा कालावधी कमी होत आहे. त्यामुळे कोणत्याही विषयावर चर्चा होऊ शकत नाही. अशाप्रकारच्या कमी कालावधीत चालणारे संसदचे सत्र कधीही पाहिले नाही''. 

Web Title: marathi news national politics Yashwant Sinha Said SC Not In Order Democracy Under Threat