चालू रेल्वेत मुस्लिम कुटुंबास मारहाण

वृत्तसंस्था
शनिवार, 15 जुलै 2017

जुनैद खान या युवकावर रेल्वेत झालेल्या हल्ल्याची घटना ताजी असताना आता शिकोहाबाद-कासगंजदरम्यान धावणाऱ्या रेल्वेतून प्रवास करणाऱ्या एका मुस्लिम कुटुंबाला जमावाने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

अलाहाबाद - जुनैद खान या युवकावर रेल्वेत झालेल्या हल्ल्याची घटना ताजी असताना आता शिकोहाबाद-कासगंजदरम्यान धावणाऱ्या रेल्वेतून प्रवास करणाऱ्या एका मुस्लिम कुटुंबाला जमावाने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

याबाबत काही इंग्रजी दैनिकांनी दिलेल्या वृत्तानुसार, सदर दहा जणांचे कुटुंब एक विवाह सोहळा आटोपून रेल्वेतून फारुखाबादला जाण्यासाठी निघाले होते. ही रेल्वे मणिपुरीजवळ आल्यानंतर पाच जणांच्या जमावाने या कुटुंबावर हल्ला केला तसेच, महिलांशी असभ्य वर्तन केले. नंतर निबकारोरी स्थानक आल्यानंतर संबंधित तरुणांनी रेल्वेची चैन ओढून ती थांबवली आणि फोन करून अन्य साथीदारांना तेथे बोलावून घेतले. ते आल्यानंतर सर्वांनी लोखंडी गज व स्टीकने पुन्हा आम्हाला मारहाण केली, अशी माहिती कुटुंबातील एका सदस्याने दिली आहे.

या मारहाणीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यात काही तरुण आपात्कालीन खिडकीच्या काचा फोडून आत प्रवेश करत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, रेल्वे पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा नोंद केला असून, याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

वेगळे दिसतो म्हणून मारहाण
आम्ही इतरांपेक्षा वेगळे दिसतो, या कारणास्तव आम्हाला मारहाण झाली. असा आरोप संबंधित कुटुंबातील सदस्यांनी केला आहे. ही मारहाण इतकी बेदम होती, की काही जणांची हाडे फ्रॅक्‍चर झाली असून, काहींच्या पोटाच्या आतील भागात जखमा झाल्या आहेत.