कोविंद यांना पाठिंबा दिला आहे; मोदींना नाही : संयुक्त जनता दल

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 जून 2017

किंबहुना, गेल्या तीन वर्षांत देशातील सौहार्दाचे वातावरण ढवळून निघाले आहे. अयोध्या, समान नागरी कायदा आणि 370 कलम या मुद्यांवर संयुक्त जनता दल आणि 'एनडीए'मध्ये असलेले मतभेद कायम आहेत. 
- के. सी. त्यागी, संयुक्त जनता दलाचे प्रवक्ते

नवी दिल्ली : 'भाजपप्रणित 'राष्ट्रीय लोकशाही आघाडी'चे (एनडीए) राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा दिला असला, तरीही पुन्हा या आघाडीत जाण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही', असे प्रतिपादन संयुक्त जनता दलातर्फे आज (गुरुवार) करण्यात आले. तीन वर्षांपूर्वी पंतप्रधानपदासाठी भाजपने नरेंद्र मोदी यांना उमेदवारी दिल्यानंतर नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाने 'एनडीए'मधून बाहेर पडण्याचा मार्ग स्वीकारला होता. 

राष्ट्रपतीपदासाठी भाजपतर्फे रामनाथ कोविंद यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. कोविंद हे सध्या बिहारचे राज्यपाल आहेत आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याशी त्यांचे सौहार्दाचे संबंध आहेत. यामुळे काँग्रेसप्रणित 'संयुक्त पुरोगामी आघाडी'च्या (यूपीए) गोटात सामील न होता नितीशकुमार यांनी कोविंद यांना पाठिंबा जाहीर केला. 'कोविंद यांना पाठिंबा देणे म्हणजे पुन्हा 'एनडीए'मध्ये दाखल होणे असा त्याचा अर्थ नाही,' अशी भूमिका संयुक्त जनता दलाचे राष्ट्रीय प्रवक्ते के. सी. त्यागी यांनी मांडली. 

'बिहार सरकारमध्ये कोविंद यांची भूमिका अत्यंत सकारात्मक आणि ढवळाढवळ न करण्याची होती. ते दोन वर्षे बिहारचे राज्यपाल आहेत. हे पदाचा मान त्यांनी राखला आहे. याचमुळे नितीशकुमार यांनी कोविंद यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला', असे त्यागी यांनी सांगितले. कोविंद यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यामुळे 'यूपीए'च्या बैठकीला उपस्थित राहण्यात काही अर्थ नव्हता, असेही त्यागी यांनी स्पष्ट केले. 

मात्र कोविंद यांना पाठिंबा देणे म्हणजे संयुक्त जनता दल पुन्हा 'एनडीए'मध्ये दाखल होत आहे असा घेऊ नका, असा इशाराही त्यागी यांनी दिला. 'राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत समर्थन दिले असले, तरीही मोदी सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरलेले आहे, ही आमची भूमिका कायम आहे', असेही त्यांनी सांगितले.