मुलींनी रस्त्यावर फोन वापरल्यास 21 हजार दंड; पंचायतीचा अजब निर्णय

वृत्तसंस्था
बुधवार, 3 मे 2017

मथुरा जिल्ह्यातील मदोरा गावातील पंचायतीने अजब निर्णय दिला आहे. रस्त्यावरून चालताना फोन वापरणाऱ्या मुलींना तब्बल 21 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार असल्याचा आदेश पंचायतीने काढला आहे.

लखनौ (उत्तर प्रदेश) : मथुरा जिल्ह्यातील मदोरा गावातील पंचायतीने अजब निर्णय दिला आहे. रस्त्यावरून चालताना फोन वापरणाऱ्या मुलींना तब्बल 21 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार असल्याचा आदेश पंचायतीने काढला आहे.

मदोरा गावातील पंचायतीने गावातील गुन्ह्यांवर नियंत्रण बसावे यासाठी पाच समित्यांची स्थापना केली आहे. या समित्या गुन्ह्यांबाबत सुपर समितीला माहिती देतील. त्यानंतर सुपर समिती कारवाई करेल. मंगळवारी झालेल्या पंचायतीच्या बैठकीत विविध स्वरुपातील गुन्ह्यांतील दोषींना ठोठावण्यात येणाऱ्या दंडाचे स्वरुप निश्‍चित करण्यात आले. गावातील प्रमुख मोहम्मद गफार यांनी या संदर्भातील काही आदेश दिले आहेत. रस्त्यावरून चालताना फोन वापरणाऱ्या मुलींना 21 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. तर, गोहत्येमध्ये सहभागी असणाऱ्यांना दोन लाख रूपयांचा दंड आणि मद्यविक्री करणाऱ्यांना 1.11 लाखाचा दंड ठोठावण्याचा आदेश दिला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोहत्येविरोधी मोहिमेला मुस्लिम समुदायाचे समर्थन असल्याचे गफार यांनी सांगितले आहे. गोहत्येसंदर्भात माहिती देणाऱ्यांना 51 हजार रुपये देण्यात येणार आहेत.

या आदेशाद्वारे ज्यांना दंड ठोठावण्यात येईल, त्यांना दंडाची रक्कम काही भागांमध्ये देण्याबाबतचा निर्णय संपूर्ण पंचायत मिळून घेण्याचेही ठरविण्यात आले आहे.