जवानांचे शिरच्छेद अन् सरकारला गोहत्याबंदीची गुंगी- शिवसेना

टीम ई सकाळ
बुधवार, 3 मे 2017

पाकविरुद्ध आपल्या बाजूने किती देश आहेत?
पाकिस्तानच्या सापळ्यात आम्ही फसलो आहोत. जगातील किती देश या प्रश्नी आमच्या बाजूने उभे आहेत ते पंतप्रधानांनी जाहीर करावे, असे आव्हान शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे. 

मुंबई : "पाकिस्तानच्या सापळ्यात आम्ही फसलो आहोत. जगातील किती देश या प्रश्नी आमच्या बाजूने उभे आहेत ते पंतप्रधानांनी जाहीर करावे. नोटाबंदीच्या गुंगीतून आणि गोहत्येच्या मारामारीतून देश भानावर येईल त्या दिवशी उशीर झालेला असेल." अशी त टीका शिवसेनेने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.  

सरकार बदललंय असं वाटत नाही!
'काँग्रेस राजवटीत जवानांच्या शिरच्छेदाच्या घटना झाल्या तेव्हा एका जवानाच्या बदल्यात पाकड्यांची दहा मुंडकी कापून आणू अशा वीर गर्जना करणाऱ्यांचे राज्य दिल्लीत आहे; पण पाककडून आमच्या जवानांचा आणि स्वाभिमानाचा शिरच्छेद सुरूच आहे. राज्य बदलले आहे असे अजूनही वाटत नाही,' असा सणसणीत टोला सेनेने मोदी सरकारला हाणला आहे.

गोहत्याबंदी आणि नोटबंदीची गुंगी देऊन देशाला झोपवता येणार नाही असे स्पष्ट करीत 'सामना' या मुखपत्रातून शिवसेनेने सरकारला धारेवर धरत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. 

बलिदान व्यर्थ चाललेय
'नायब सुभेदार परमजीत सिंग आणि हेड कॉन्स्टेबल प्रेम सागर यांची हत्या पाकिस्तानच्या लष्कराने ज्या निर्घृणपणे केली त्या अमानुष आणि पाशवी कृत्याचा फक्त निषेध करून पाकड्यांचे काय वाकडे होणार आहे? नवे संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी जाहीर केले आहे, ‘‘हे बलिदान व्यर्थ जाणार नाही!’’ माफ करा जेटलीजी, आम्हाला नाइलाजाने आणि विनम्रपणे सांगायलाच हवे की, जवानांचे बलिदान व्यर्थ चालले आहे. पाकिस्तानसारखा टीचभर आणि अराजकात होरपळणारा देश हिंदुस्थानच्या स्वाभिमानाचा रोज कोथळा काढत असताना देशवासीयांना नोटाबंदीच्या गुंगीचे औषध देऊन झोपवता येणार नाही.

सर्जिकल स्ट्राइकही कुचकामीच
पठाणकोट झाले, उरी झाले, मछली क्षेत्रातील नियंत्रण रेषेजवळील लष्करी छावणीवरील दहशतवादी हल्ला झाला. हे सर्व प्रकार रोखण्यास तुमचे ते सर्जिकल स्ट्राइकही कुचकामीच ठरले. उत्तर प्रदेशच्या प्रचारात सर्जिकल स्ट्राइकचा इतका बेंडबाजा वाजवला की, हे सर्जिकल स्ट्राइक जवानांनी केले नाही तर भारतीय जनता पक्षाच्या मंडळींनीच केले असेच वातावरण निर्माण केले. हीसुद्धा जवानांच्या शौर्याची विटंबनाच होती, असे शिवसेनेने म्हटले आहे. 

जवानांच्या रक्तामांसाचा चिखल
नोटाबंदीनंतर पाकिस्तानचे हल्ले व देशांतर्गत दहशतवाद शतपटीने वाढला. गोहत्येचे पातक नको असे ज्यांना वाटते त्यांना जवानांच्या हत्येचे पातक चालते काय? मांसाहार करणाऱ्यांना विरोध, मग जवानांच्या रक्तामांसाचा जो चिखल सुरू आहे तो पाकड्यांचा शाकाहार मानून श्रद्धांजल्यांची चटईश्राद्धं उरकायची काय? हे प्रश्न घणासारखे घाव घालत आहेत.