मोदींना लोकांच्या बाथरुममध्ये डोकावणे आवडते : राहुल गांधी

वृत्तसंस्था
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

लखनौ- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकांच्या बाथरुममध्ये डोकावणे आवडते, असे म्हणत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला.

लखनौ- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकांच्या बाथरुममध्ये डोकावणे आवडते, असे म्हणत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला.

काँग्रेसने समाजवादी पक्षासोबत आज (शनिवार) घेतलेल्या संयुक्त पत्रकारपरिषदेत राहुल गांधी बोलत होते. ते म्हणाले, "मोदींना गुगल वापरणे, भविष्य वाचणे आणि लोकांच्या बाथरुममध्ये डोकावणे या गोष्टी आवडतात. त्यांच्याकडे जेव्हा प्रश्नांची उत्तरे नसतात, तेव्हा लक्ष विचलीत करण्यासाठी ते अशा प्रकारच्या नीतीचा वापर करतात. त्यांच्या सरकारचे गेल्या अडीच वर्षातील अपयश झाकण्यासाठी ते अशा प्रकारे लोकांचे लक्ष विचलित करतात. लोकसभा निवडणुकीवेळी मोदींनी देशात दोन कोटी रोजगार निर्माण करण्याचे आश्वासन दिले होते. त्यात ते पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. त्यामुळे ते अशा प्रकारची वक्तव्ये करत आहेत.'

काँग्रेस व समाजवादी पक्ष उत्तर प्रदेशचा विकास करण्यासाठी एकत्र आले आहेत. पुढील पाच वर्षात उत्तर प्रदेश मध्ये बदल घडेल असे आश्वासनही यावेळी गांधी यांनी दिले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज काँग्रेस-सपा आघाडीचा किमान सामायिक कार्यक्रम जाहीर केला. त्याअंतर्गत दहा कलमी कार्यक्रम घोषित करण्यात आला. यात तरुणांना मोफत स्मार्ट फोन, वीस लाख तरुणांना रोजगार, शेतकऱ्यांची कर्जमाफी, वीजेच्या दरात कपात, गरिबांसाठी निवृत्तीवेतन सुविधा, चांगल्या पायाभूत सुविधा, गुणवत्ता यादीत येणाऱ्या मुलींना सायकल, सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण, दलित व मागासवर्गीयांना मोफत घरे वाटप इत्यादींचा समावेश आहे.

Web Title: Modi loves to see in others bathroom : Rahul Gandhi