उद्यमेन हि सिध्यन्ति - नरेंद्र मोदी 

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

विरोधकांनी चार्वांकांची शिकवण जरा जास्तच गांभीर्याने घेतल्याचे दिसते आहे. ऋण काढा पण सण साजरा करा. मृत्युनंतर कोणी आयुष्य पाहिले आहे, हेच विरोधकांचे धोरण दिसते

नवी दिल्ली - राष्ट्रपतींच्या अभिभाषणास उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवार) लोकसभेमध्ये बोलताना सरकारच्या विविध धोरणांचे ठाम समर्थन करतानाच विरोधकांनाही लक्ष्य केले. मोदी यांनी आपल्या भाषणात वक्रोक्ती, उपहास अशा विविध अस्त्रांचा भरपूर वापर केला. याचबरोबर, पंतप्रधानांनी संस्कृत सुभाषिते, हास्यकवितेसहित चार्वाक या प्राचीन ऋषीच्या प्रसिद्ध सुभाषिताचाही समावेश त्यांच्या भाषणात केला.

"विरोधकांनी चार्वांकांची शिकवण जरा जास्तच गांभीर्याने घेतल्याचे दिसते आहे. ऋण काढा पण सण साजरा करा. मृत्युनंतर कोणी आयुष्य पाहिले आहे, हेच विरोधकांचे धोरण दिसते,'' अशा शब्दांत पंतप्रधानांनी विरोधकांवर उपहासात्मक कोरडे ओढले. चार्वाकांसहित इतरही सुभाषितांचा सढळ वापर पंतप्रधानांच्या भाषणामध्ये दिसून आला. 

पंतप्रधानांच्या भाषणामधील "साहित्य' - 

अंतरपट में खोजिए, छिपा हुआ है खोट,
मिल जाएगी आपको, बिल्कुल सत्य रिपोट (काका हाथरसी) 

यावज्जीवेत, सुखम जीवेत 
ऋणम क्रित्वा, घृतम पिबेत 
भस्मिभूतस्य देहस्य 
पुनार्गमनम कुत: 
- चार्वाक  

अमंत्र् अक्षरं नास्ति: नास्ति मुलं अनौषधम्‌ ! अयोग्य: पुरुषो नास्ति: योजकस्त्र दुर्लभ:(ज्यापासून मंत्र बनू शकत नाही; असे कोणतेही अक्षर नाही. अशी कोणतीही वनस्पती नाही की, ज्यामध्ये औषधी गुण नाही. असा कोणताही मानवही नाही, जो सर्वथा अयोग्य आहे. (केवळ) यांची योजना योग्य ठिकाणी करणारा योजकच अत्यंत दुर्मिळ आहे) 

उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि  न मनोरथैः  |
नहि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे  मृगाः ||    
(केवळ मनोरथ रचल्याने नव्हे; तर निरंतर उद्योग करत राहिल्यानेच विविध योजना तडीस जात असतात. सुप्त अवस्थेत असलेल्या सिंहाच्या मुखात हरिण स्वत:हून प्रवेश करत नाही.)