पंतप्रधान मोदी लिहिणार युवकांसाठी पुस्तक

पीटीआय
मंगळवार, 4 जुलै 2017

"मन की बात'ला मिळालेल्या मोठ्या प्रतिसादामुळे पंतप्रधानांना अशा प्रकारचे पुस्तक लिहिण्याची कल्पना सुचली. माझ्या मनाशी अगदी जवळचा असणारा हा विषय असल्याने मी तो निवडला, तसेच उद्याच्या तरुणाईने भारलेल्या समाजाबाबतचा माझा मूलभूत दृष्टिकोन मी पुस्तकरूपाने मांडत असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आता युवकांसाठी पुस्तक लिहिणार आहेत. देशाच्या इतिहासात विद्यमान पंतप्रधानांनी पुस्तक लिहिण्याची ही पहिलीच वेळ आहे. परीक्षेच्या काळात ताणाशी कसा सामना करायचा, मानसिक संतुलन कसे राखायचे, त्याचप्रमाणे परीक्षेनंतर काय करायचे, याचे मार्गदर्शन या पुस्तकातून मोदी युवकांना करणार आहेत.

"पेंग्विन रॅंडम हाउस'तर्फे हे पुस्तक प्रकाशित करण्यात येणार असून, अनेक भाषांत ते उपलब्ध असणार आहे. पुढील वर्षी ते बाजारात उपलब्ध होईल. दहावी व बारावी या महत्त्वाच्या परीक्षांशी संबंधित, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांशी संबंधित अनेक अंगांना हे पुस्तक स्पर्श करेल. हे पुस्तक विद्यार्थ्यांचा निश्‍चित मित्र बनेल आणि परीक्षांची तयारी करण्यास त्यांना मदत करेल, अशी मोदी यांना आशा असल्याचे प्रकाशकांनी म्हटले आहे.

गुणांपेक्षाही ज्ञान मिळवण्यास प्राधान्य देण्याची कशी गरज आहे, तसेच भविष्यासाठी जबाबदारी कशा प्रकारे स्वीकारायची, याबाबत पुस्तकातून अनौपचारिकपणे संवाद साधण्याचा मोदी यांचा प्रयत्न असणार आहे. "मन की बात'ला मिळालेल्या मोठ्या प्रतिसादामुळे पंतप्रधानांना अशा प्रकारचे पुस्तक लिहिण्याची कल्पना सुचली.
माझ्या मनाशी अगदी जवळचा असणारा हा विषय असल्याने मी तो निवडला, तसेच उद्याच्या तरुणाईने भारलेल्या समाजाबाबतचा माझा मूलभूत दृष्टिकोन मी पुस्तकरूपाने मांडत असल्याचे मोदी यांनी म्हटल्याचे प्रकाशकांनी निवेदनाद्वारे जाहीर केले आहे.