आंतरजातीय विवाहांत RSS स्वयंसेवक पुढे- भागवत

वृत्तसंस्था
गुरुवार, 30 मार्च 2017

संघाच्या विचारांचा प्रसार करणाऱ्या 'ऑर्गनायझर' या इंग्रजी नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत भागवतांनी आंतरजातीय विवाहांचे समर्थन केले आहे. 

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशात आंतरजातीय विवाहाचं समर्थन केले आहे. आंतरजातीय विवाह करणाऱ्यांमध्ये संघाच्या स्वयंसेवकांची संख्या इतरांपेक्षा जास्त असेल, असा दावा त्यांनी केला. 

संघाच्या स्वयंसेवकांनी अशी सुधारणावादी पाऊले उचलावीत असे आवाहनही त्यांनी केले आहे. संघाच्या विचारांचा प्रसार करणाऱ्या 'ऑर्गनायझर' या इंग्रजी नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत भागवतांनी आंतरजातीय विवाहांचे समर्थन केले आहे. 

भागवत म्हणाले, "आंतरजातीय विवाह हे हिंदूंमध्ये अजूनही वादग्रस्त मानले जातात. ते स्वीकारले जात नाहीत. स्वयंसेवकांनी अशी सुधारणावादी पाऊले उचलून त्यावर भर देणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांना संघातून पाठिंबा दिला जातो आणि असे व्हायलाच पाहिजे.
सामाजिक समानता वाढविण्यासाठी या विचारांचे लोक जिथे सत्तेत आहेत तिथे दलित, आदिवासींसंबंधी घटनात्मक आणि कायदेशीर तरतुदी सक्तीने लागू करायला हव्यात."