मॉन्सून एक्सप्रेस कर्नाटकात दाखल !

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 मे 2018

मॉन्सून सर्वसाधारणपणे १ जून रोजी केरळमध्ये दाखल होत असतो. मात्र यंदा तो तीन दिवस आधी केरळात धडकेल, असे हवामान विभागाने आधीच जाहीर केले होते. हा अंदाज अचूक ठरवत माॅन्सून मंगळवारी केरळमध्ये दाखल झाला.

पुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांची (मॉन्सून) वाटचाल सुरूच असून, बुधवारी (ता.३०) मॉन्सूनने अरबी समुद्रातून प्रगती करत कर्नाटकात धडक दिली आहे. कर्नाटक किनारपट्टीचा बहुतांशी भाग, अंतर्गत कर्नाटकचा काही भागात मॉन्सून दाखल झाल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे.

मॉन्सून सर्वसाधारणपणे १ जून रोजी केरळमध्ये दाखल होत असतो. मात्र यंदा तो तीन दिवस आधी केरळात धडकेल, असे हवामान विभागाने आधीच जाहीर केले होते. हा अंदाज अचूक ठरवत माॅन्सून मंगळवारी केरळमध्ये दाखल झाला. माॅन्सूनने अरबी समुद्र, केरळ, तमिळनाडूसह बंगालच्या उपसागराचा आणखी काही भागात प्रगती केल्याचे जाहीर करण्यात आले. माॅन्सूनने केरळच्या कर्नुल, तमिळनाडूच्या कोईंबतूर, कोडाईकेनॉल, तुतीकोरीनपर्यंतचा भाग व्यापला आहे. 

गेल्या तीन ते चार दिवसांमध्ये केरळमध्ये पाऊस पडत असून, १४ केंद्रांवर ६० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. या भागात पश्‍चिमेकडून तीस नॉट्स वेगाने वारे वाहत असून, दक्षिण अरबी समुद्रावर साडेचार किलोमीटर उंचीपर्यंत पश्‍चिम किंवा नैर्ऋत्येकडून वारे वाहत असल्याचे दिसून आले आहे. या भागात ढगांची दाटी असून, वातावरणात जाणाऱ्या दीर्घ किरणोत्सारी लहरींच्या स्थितीचा विचार करून मॉन्सून केरळमध्ये दाखल झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

Web Title: Monsoon arrives in Karnataka hevay rain in Mangalore