पेडणेतील 'त्या' महाविद्यालयाची मान्यता कायम

अवित बगळे
मंगळवार, 4 एप्रिल 2017

पणजीः मांद्रे येथील पेडणे तालुका विकास परिषदेच्या महाविद्यालयाची मान्यता कायम ठेवण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने आज (मंगळवार) दिला. मांद्रे मतदारसंघातून सात हजारापेक्षा जास्त मतांनी दारूण पराभव झालेल्या लक्ष्मीकांत पार्सेकर यांना ही जोरदार चपराक आहे.

या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हे पार्सेकर यांचे परांपरागत राजकीय प्रतिस्पर्धी माजी केंद्रीयमंत्री ऍड रमाकांत खलप आहेत. 2012 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या सरकारने मांद्रेतील या महाविद्यालयाला अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. संस्थेला पत्राने हा निर्णयही कळविण्यात आला होता. मात्र पर्रीकर दिल्लीत संरक्षणमंत्रीपदी दिल्लीला गेल्यानंतर मुख्यमंत्रीपदी आलेल्या पार्सेकर यांनी हा निर्णय फिरवला होता. सरकारने मान्यता काढून घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गोवा विद्यापीठानेही या महाविद्यालयाला सलग्नता नाकारली होती. पार्सेकर यांच्या या निर्णयाविरोधात मांद्रेतील सर्व नेते व जनता एकटवले होते. राजकीय मतभेद विसरून सर्वांनी खलप यांना पाठींबा दिला होता. या साऱ्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीत जाणवून पार्सेकर हे मुख्यमंत्रीपदी असूनही सात हजार पेक्षा जास्त मतांनी पराभूत झाले होते.

आपली बाजू ऐकून न घेता सरकारने मान्यता नाकारण्याचा निर्णय घेतला त्यामुळे तो निर्णय रद्द करावा अशी मागणी शिक्षण संस्थेच्या वतीने ऍड खलप यांनी केली होती. न्यायालयाने त्यांची ही मागणी मान्य करताना मान्यता रद्द करण्याचा निर्णय रद्द केला. संस्थेची बाजू ऐकून घेऊन योग्य तो निर्णय घेण्यास सरकारला मोकळीक दिली आहे.