प्रकल्प वेळेत पूर्ण करणार : मोदी

वृत्तसंस्था
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

निवडणुकीच्या प्रचारामध्ये मोठमोठी आश्‍वासने देण्याची आपल्याकडे जुनी परंपरा आहे. मागील अनेक वर्षांपासून ती सुरू आहे. आमच्या सरकारने विविध विकासकामांचा वेग आणि त्याची व्याप्ती वाढविली आहे. आम्ही विकास केला आहे राजकारण नाही

उदयपूर (राजस्थान) - देशातील पायाभूत सुविधांशी संबंधित प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असून, आमच्या सरकारने काही धाडसी निर्णय घेतले आणि ते तडीसही नेले. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या हातात देशाची सत्ता आली, तेव्हा सगळी व्यवस्थाच कोलमडलेली होती, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे सभेत बोलताना केले.

प्रतिकूल परिस्थितीमध्ये दुसरा कोणी असता तर कोलमडून पडला असता; पण आम्ही वेगळ्या मातीचे बनलेलो आहोत. आम्ही आव्हाने स्वीकारली आणि उत्तरे शोधत प्रगतीच्या मार्गावर चालत राहिलो, असे मोदी यांनी नमूद केले. या वेळी पंतप्रधानांच्या हस्ते राजस्थानातील विविध महामार्ग प्रकल्पांचे उद्‌घाटन आणि लोकार्पण करण्यात आले. या प्रकल्पांवर पंधरा हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मोदींनी या वेळी पूर्णत्वास गेलेले 11 राष्ट्रीय महामार्ग राष्ट्राला अर्पण केले.

ते म्हणाले की, ""निवडणुकीच्या प्रचारामध्ये मोठमोठी आश्‍वासने देण्याची आपल्याकडे जुनी परंपरा आहे. मागील अनेक वर्षांपासून ती सुरू आहे. आमच्या सरकारने विविध विकासकामांचा वेग आणि त्याची व्याप्ती वाढविली आहे. आम्ही विकास केला आहे राजकारण नाही.''