कुटुंबाच्या निर्वाहासाठी टीव्ही मालिकेत काम करण्याची गरज : सिद्धू

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 मार्च 2017

माजी क्रिकेटपटू पंजाबमधील मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांच्या दूरचित्रवाहिनी मालिकांमधील सहभागाबाबत उपस्थित करण्यात येत असलेल्या प्रश्‍नांबाबत बोलताना कुटुंबाच्या निर्वाहासाठी टीव्ही मालिकेत काम करण्याची गरज असल्याचे सिद्धू यांनी स्पष्ट केले आहे.

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू आणि पंजाबमधील मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांच्या दूरचित्रवाहिनी मालिकांमधील सहभागाबाबत उपस्थित करण्यात येत असलेल्या प्रश्‍नांबाबत बोलताना कुटुंबाच्या निर्वाहासाठी टीव्ही मालिकेत काम करण्याची गरज असल्याचे सिद्धू यांनी स्पष्ट केले आहे.

विनोदी अभिनेता कपिल शर्मा यांच्या 'द कपिल शर्मा शो' मध्ये सिद्धू सहभाग घेतात. मात्र मंत्री झाल्यानंतर त्यांनी सहभाग घ्यावा का याबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनीही यासंदर्भात कायदेशीर सल्ला मागितला आहे. दरम्यान पंजाबच्या महाधिवक्ता पिंकी आनंद यांनी "मला वाटते हे अगदी स्पष्ट आहे की, जेव्हा एखादी व्यक्ती घटनात्मक पद्धतीने मंत्रीपदाची शपथ घेतो, त्यावेळी त्याला कोणत्याही खाजगी पदावर काम सुरू ठेवता येत नाही' असे स्पष्ट केले आहे.

सिद्धू यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले होते कि, 'माझ्या दूरचित्रवाहिन्यांवरील (टीव्ही) मालिकांमधील सहभागामुळे माझ्या कामकाजावर काहीही परिणाम होणार नाही. काही वेळा मी सात दिवस सकाळपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत काम केले; तर सहानंतर मी काय करायचे याच्याशी कोणालाही काही देणे-घेणे नाही. जर मी महिन्यातील चार दिवस रात्रीचे सात वाजल्यापासून सकळच्या सहा वाजेपर्यंत काम केले तर लोकांच्या पोटात का दुखते?'