बातम्या देण्यास अर्णब गोस्वामींना मुभा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरण; उच्च न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्ली: रिपब्लिकन टीव्हीचे प्रमुख अर्णब गोस्वामी यांना सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणाशी संबंधित बातम्या प्रसिद्ध करण्यास प्रतिबंध करण्यास आज दिल्ली उच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दांत नकार दिला.

सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणाची सुनावणी पूर्ण होईपर्यंत त्याविषयी रिपब्लिकन या वृत्तवाहिनीवर प्रसारित होणाऱ्या बातम्यांना आवर घालावा, अशी मागणी त्यांचे पती व कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी करत उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आज याप्रकरणी झालेल्या सुनावणीत न्यायाधीश मनमोहन यांनी सुनावणी पूर्ण होईपर्यंत अशा प्रकारचे कोणतेही आदेश देता येणार नसल्याचे स्पष्ट केले. न्यायालयाने गोस्वामी यांना नोटीस पाठवून म्हणणे सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत.

पत्रकाराला एखाद्या प्रकरणाचा तपास अथवा चौकशी करता येत नाही, असा कोणताही कायदा थरूर यांना निदर्शनास आणून देता आलेला नाही, याकडेही न्यायालयाने लक्ष वेधले. सुनावणीच्या पहिल्या तारखेनंतर गोस्वामींनी तुमचा उल्लेख खुनी असा केल्याचे मला दाखवून द्या, असा सवालही न्यायालयाने उपस्थित केला. वृत्तवाहिनीचे संपादकीय धोरण कसे असावे, याबाबतचे आदेश मला देता येणार नाहीत, असेही न्यायाधीशांनी स्पष्ट केले.