भाजपच्या मुख्यमंत्र्यांची दिल्लीत सोमवारी बैठक

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

शेतकरी आंदोलनाबाबत प्रश्‍न अपेक्षित

शेतकरी आंदोलनाबाबत प्रश्‍न अपेक्षित

नवी दिल्ली: भाजपच्या तेरा मुख्यमंत्र्यांची तिसरी आढावा बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या सोमवारी (ता. 21) दिल्लीत बोलावली आहे. भाजप मुख्यालयात होणाऱ्या या महत्त्वपूर्ण बैठकीकडे 2019च्या निवडणुकीची पूर्वतयारी म्हणूनही पाहिले जाते. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मध्य प्रदेशाचे शिवराजसिंह चौहान यांना शेतकरी आदोलनांबाबत पक्षनेतृत्वाकडून प्रश्‍न विचारले जाऊ शकतात, असे सूत्रांनी सांगितले. शेतकरी कर्जमाफीवरून उत्तर प्रदेशात न उद्‌भवलेला वाद महाराष्ट्रातच कसा उद्‌भवला, त्यामागची नेमकी कारणे कोणती, याचेही स्पष्टीकरण फडणवीस देण्याची शक्‍यता आहे.

भाजप सरकारांचे प्रसारमाध्यमांतील प्रतिबिंब नकारात्मक नको, तर सकारात्मक हवे हा मोदींचा आग्रह असतो. मध्य प्रदेशातील शेतकरी आंदोलनानंतरही झालेले आपत्ती व्यवस्थापन व महाराष्ट्रात अजूनही धुमसणारा वाद यावरून फडणवीस यांना नेतृत्वाच्या प्रश्‍नांच्या फैरींना तोंड द्यावे लागू शकते, असे कळते. त्याची चाहूल लागल्यानेच प्रदेश कार्यकारिणीत फडणवीस यांनी माध्यमांवर टीका केली असावी, असे सूत्रांचे निरीक्षण आहे.

केंद्र व राज्यांच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत किती प्रमाणात पोचल्या याबाबत मोदी नियमितपणे आढावा घेतात. केंद्र सरकारला तीन वर्षे पूर्ण होण्याआधी महिनाभर म्हणजे यंदा एप्रिलमध्ये रात्री बारापर्यंत चाललेल्या पाच तासांच्या मॅरेथॉन सीएम बैठकीचा पुढचा टप्पा म्हणजे प्रस्तावित बैठक असेल. पंतप्रधान पीक विमा, डिजिटल इंडिया, उज्ज्वला, मुद्रा, सोशल मीडिया आदी योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा मोदी या बैठकीत घेतील. पक्षाध्यक्ष अमित शहा, संघटनमंत्री रामलाल, उत्तर प्रदेशाचे योगी आदित्यनाथ, गरीब कल्याण योजना आढावा उपक्रमाचे प्रमुख डॉ. विनय सहस्रबुद्धे तसेच सुषमा स्वराज, नितीन गडकरी यांच्यासह वरिष्ठ मंत्री या बैठकीस हजर राहतील.

"ग्राउंड झिरो'चा आढावा
राजकीय पातळीवर 2019 च्या निवडणुकीची राज्यांराज्यांतील तयारी कोणत्या टप्प्यावर आहे याबाबत मोदी मुख्यमंत्र्यांकडून "ग्राउंड झिरो'चा आढावा घेतील. ज्या राज्यांत 2014 मध्ये भाजप कमजोर होता तेथील 150 जागांवर आगामी निवडणुकीत जोर लावण्याचे भाजपने ठरविले आहे. या दृष्टीने कोणते मुख्यमंत्री कोणत्या राज्यांची जबाबदारी घेऊ शकतात याचीही चाचपणी केली जाईल.