शिक्षा माफीसाठी कर्नान नव्या राष्ट्रपतींच्या दारात

वृत्तसंस्था
बुधवार, 26 जुलै 2017

कोलकता: राष्ट्रपतिपदाची शपथ घेतल्यानंतर आज पहिल्याच दिवशी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासमोर कलकत्ता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश सी. एस. कर्नान यांनी आपली फिर्याद मांडली. अवमानप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सुनावलेली सहा महिन्यांची शिक्षा माफ करावी, अशी विनंती कर्नान यांनी राष्ट्रपतींकडे केली आहे.

आपल्या विविध निर्णयांमुळे आणि आरोपांमुळे वादग्रस्त ठरलेले कर्नान यांनी त्यांचे वकील मॅथ्यूज जे. नेदूम्पारा यांच्यामार्फत राष्ट्रपती कोविंद यांच्या कार्यालयामध्ये म्हणणे सादर केले. सर्वोच्च न्यायालयाने सुनावलेली सहा महिन्यांची शिक्षा माफ करावी, असे या कर्नान यांनी या विनंती अर्जामध्ये म्हटले आहे. कोविंद यांच्याकडे थेटपणे म्हणणे मांडण्यासाठी त्यांची वेळही लवकरच मागणार असून, त्यासाठी राष्ट्रपती भवनाशी संपर्कात आहोत, असे नेदूम्पारा यांनी पत्रकारांना सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाने कर्नान यांना 9 मे रोजी सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर ते काही काळ फरारी होते. त्यांना 20 जूनला कोइमतूर येथे अटक करण्यात आली. अटक होणारे ते भारतातील उच्च न्यायालयाचे पहिले विद्यमान न्यायाधीश आहेत.