जीएसटीत औषधांच्या किमती बदलणार नाहीत

वृत्तसंस्था
शनिवार, 1 जुलै 2017

जीएसटीची अंमलबजावणी हे सुरळीतपणे होईल. यामुळे देशातील औषधांच्या उपलब्धतेत मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होण्याची शक्‍यता नाही.
- भूपेंद्रसिंह, अध्यक्ष, एनपीपीए

राष्ट्रीय औषधे किंमत प्राधिकरणाची माहिती

नवी दिल्ली: नियमित वापरातील सुमारे 78 टक्के औषधांच्या किमती वस्तू व सेवाकर (जीएसटी) लागू झाल्यानंतर बदलणार नाहीत, अशी माहिती राष्ट्रीय औषधे किंमत प्राधिकरणाने (एनपीपीए) शुक्रवारी दिली.

"एनपीपीए'ने याआधी 761 औषधांची कमाल किंमत मर्यादा जाहीर केली आहे. यात कर्करोगविरोधी, एचआयव्ही, मधुमेह आणि प्रतिजैविक औषधांचा समावेश आहे. जीएसटीची अंमलबजावणी होण्याआधीच या औषधांच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. आता जीएसटीची अंमलबावणी झाल्यांनरत सुधारित कमाल किमती आठवडाभरात जाहीर करण्यात येणार आहेत. नियमित वापरातील सुमारे 78 टक्के औषधांच्या किमतीवर जीएसटीचा कोणताही परिणाम होणार नाही, असे "एनपीपीए'ने स्पष्ट केले आहे.

जीएसटी लागू झाल्यानंतर जीवनावश्‍यक औषधांच्या किमती 2.29 टक्के वाढतील, असे सूतोवाच आधीच करण्यात आले आहे. सध्या जीवनावश्‍यक औषधांवर नऊ टक्के कर असून, जीएसटीमध्ये तो 12 टक्‍क्‍यांवर जाणार आहे. यामुळे किमती वाढणार आहेत.