भाजप, काँग्रेसचे लक्ष गुजरातवर

वृत्तसंस्था
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीसाठी हालचाली

नवी दिल्ली : भाजप आणि काँग्रेसने आता आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी आज निवडणुकीसाठी रणनीती ठरवण्याच्या दृष्टिकोनातून प्रमुख नेत्यांची बैठक घेतली, तर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सुकाणू समिती स्थापन केली.

भाजपने गुजरातमध्ये "मिशन-150'चे लक्ष्य बाळगले असून, शहा यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत गुजरातचे निवडणूक प्रभारी आणि केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्यासह नरेंद्र सिंह, जितेंद्र सिंह, पी. पी. चौधरी अणि निर्मला सीतारमण हे चार सहायक प्रभारीही उपस्थित होते. राम लाल आणि भूपेंदर यादव हे नेतेही बैठकीला हजर होते.

बैठकीत गुजरात निवडणुकीवर सविस्तर चर्चा झाली. आम्ही 182 सदस्यांच्या विधानसभेत 150 जागा जिंकण्याचे लक्ष्य बाळगले आहे आणि ते साध्य करण्यासाठी आम्ही उत्साहाने काम करणार आहोत, असे यादव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

दुसऱ्या बाजूला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही आज गुजरात निवडणुकीसाठी चार सदस्यांचा समावेश असलेल्या सुकाणू समितीची स्थापना केली. या संदर्भात जारी करण्यात आलेल्या निवेदनात पक्षाचे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी म्हटले आहे, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यातील सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेस कोणतीही कसर बाकी सोडणार नाही.

काँग्रेसच्या समितीत बाळासाहेब थोरात
सोनिया गांधी यांनी स्थापन केलेल्या सुकाणू समितीमध्ये काँग्रेसचे सचिव गिरीश चोदनकर, आमदार आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात, उत्तर प्रदेशचे आमदार अजय लल्लू आणि माजी खासदार मीनाक्षी नटराजन यांचा समावेश आहे.