'लूक आउट'च्या विरोधात कार्ती चिदंबरम न्यायालयात

वृत्तसंस्था
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांच्याविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) भ्रष्टाचाराच्या प्रकरणात लूक आउट नोटीस जारी केली असून, त्यांना देश सोडून बाहेर जाण्यावर बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, कार्ती चिंदबरम यांनी ही नोटीस रद्द करण्याची मागणी करत मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

कार्ती चिदंबरम यांनी देशाबाहेर दौरा करण्याआधी त्याची माहिती सीबीआय, तसेच सक्तवसुली संचालनालयाला द्यावी, असे नोटिशीमध्ये सांगण्यात आले आहे. न्यायाधीश डी. दुराईस्वामी यांनी या प्रकरणाची सुनावणी 7 ऑगस्टला होईल असे सांगितले.
आपण कोणतेही चुकीचे काम केले नसून, राजकीय हेतूने आरोप होत असल्याचा दावा कार्ती यांनी केला आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली सीबीआयने एफआयआर दाखल केल्यानंतर सक्तवसुली संचालनालयानेही (ईडी) मनी लॉंडरिंगप्रकरणी कार्ती यांच्यासह आयएनएक्‍स मीडियावर एफआयआर दाखल केला होता. या दोघांवर परदेशी गुंतवणूक संवर्धन मंडळाकडून (एफआयपीबी) मंजुरी मिळवून परदेशी गुंतवणूक मिळवण्यासाठी कथित गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. सीबीआयनेही कार्ती चिदंबरम आणि आयएनएक्‍स मीडियाविरोधात एफआयआर दाखल केला होता.

पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी यांच्या आयएनएक्‍स मीडिया या कंपनीला नियमापेक्षा अधिक विदेशी गुंतवणूक मिळवून दिल्याचा आरोप आहे. कंपनीला फक्त 4.62 कोटींची विदेशी गुंतवणूक करण्याची परवानगी असताना त्यांनी 305 कोटी रुपये उभे केले होते.

Web Title: new delhi news look out karti chidambaram and cout