रेल्वेचे नवे वेळापत्रक ऑक्‍टोबरअखेर

रेल्वेचे नवे वेळापत्रक ऑक्‍टोबरअखेर

नवी दिल्ली:  कामकाजात "केमोथेरपी' करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने कंबर कसली आहे. पहिल्या टप्प्यात संपूर्ण देशातील रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक येत्या ऑक्‍टोबर अखेरपासून बदलण्यात येणार आहे. याची डेडलाइन सुरेश प्रभू यांनी याआधी ऑगस्ट महिन्यात ठरविली होती. ती आता वाढत वाढत एक ऑक्‍टोबर व अंतिमतः 31 ऑक्‍टोबर अशी निश्‍चित झाल्याचे रेल्वे सूत्रांनी "सकाळ'ला सांगितले. पहिल्या टप्प्यात 13 हजार प्रवासी गाड्या व सात हजार मालगाड्यांच्या वेळा बदलल्या जाणार आहेत. यात मुंबईकडे जाणाऱ्या दोन्ही राजधान्यांसह महाराष्ट्रातून जाणाऱ्या कर्नाटक, हरिद्वार, दुरान्तो, यशवंतपूर, गोवा व मंगला एक्‍प्रेस आदी गाड्यांचा समावेश असल्याची निश्‍चित माहिती आहे.

देशभरात सध्या 30 राजधानी एक्‍प्रेस, शताब्दी व दुरान्तो गाड्या धावतात त्यांच्यापैकी अनेक गाड्यांच्याही वेळा बदलल्या जातील. रेल्वे मार्गाची देखभाल, दुरुस्ती व नूतनीकरण याला पुरेसा वेळ मिळावा यादृष्टीने नवे वेळापत्रक आखण्यात आले आहे. खुद्द पंतप्रधान कार्यालयाने रेल्वेतील कारभार सुधारण्याच्या दृष्टीने रोजच्या रोज "मॉनिटरिंग' सुरू केले आहे. "पीमओ'च्याच निर्देशांनुसार प्रवासी गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात येणार आहे. केवळ वेळाच नव्हे तर अनेक गाड्यांच्या मार्गांतही बदल करण्यात येणार आहेत. उदा. भोपाळ, इटारसी, भुसावळमार्गे जाणाऱ्या काही गाड्या नागपूरमार्गे तर काही गुजरातमार्गे वळविण्यात येण्याची चिन्हे आहेत. रेल्वे सूत्रांनुसार, विशेषतः जराजर्जर झालेल्या रेल्वेमार्गांना बदलण्याच्या दृष्टीने पुरेसा किमान तीन ते चार तासांचा वेळ मिळावा यासाठी हे पाऊल उचलण्याची सूचना "पीएमओ'ने केली आहे. कारण अनेक रेल्वेमार्ग जुनाट झाल्याने राजधानी गाड्यांचाही वेग त्या विशिष्ट टप्प्यात मंदावण्याशिवाय पर्याय उरत नाही. प्रभू यांच्या काळात सादर झालेल्या एका अहवालानुसार देशातील एकूण रेल्वे मार्गांपैकी तब्बल 40 टक्के मार्ग जरार्जर बनले असून असे अपघातजन्य रूळ त्वरित बदलण्याशिवाय पर्यायच उरलेला नाही. शिवाय रूळांची देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही दुष्काळ वाढत आहे. या देखभालीचे काम जुनाट व पारंपरिक पद्धतीनेच चालते त्यातही मोठे बदल करण्याचे रेल्वेने ठरविले आहे. वरवरची मलमपट्टी करून रेल्वे व प्रवाशांचा जीव जास्त काळ सुरक्षित राहू शकत नाही, असे या अहवालात स्पष्टपणे नमूद केल्याचे कळते. खुद्द रेल्वेचा सध्याचा कारभारही असा आहे की एक फाइल तयार होते व ती वर्षानुवर्षे फिरतच रहाते. या कामकाज पद्धतीतही मोठे बदल करण्याची "पीएमओ'ची सूचना आहे.

अपघातांची मालिका
- 1 ऑक्‍टोबर 2014 ः गोरखपूरला दोन गाड्यांची टक्कर, 14 जणांचा मृत्यू
- 20 मार्च 2015 ः रायबरेलीजवळ डेहराडून एक्‍स्प्रेसला अपघातात 32 ठार
- 20 नोव्हेंबर 2016 ः इंदूर-पाटणा एक्‍स्प्रेसच्या अपघातात 121 ठार
- 20 फेब्रुवारी 20-17 ः कालिंदी एक्‍स्प्रेस रूळांवरून घसरून 23 ठार
- 19 ऑगस्ट 2017 ः पुरी-हरिद्वार उत्कल एक्‍स्प्रेस खतौलीजवळ घसरून 22 जणांचा मृत्यू

पहिल्या टप्प्यातील बदल

13 हजार
प्रवासी गाड्या

07 हजार
मालगाड्या

40 टक्के
जराजर्जर मार्ग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com