अमित शहांना पदावरून हटवा

वृत्तसंस्था
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

जय शहा प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी मैत्री जपतात की सत्य आणि नौतिकचेची बाजू घेतात. याकडे नागरिकांचे लक्ष लागले असून, जर सर्व काही पारदर्शी असेल, तर त्यांनी घाबरण्याचे काहीच कारण नाही. देशातील नागरिक विकासाच्या प्रतीक्षेत असून, जयचा मात्र विकास झाला.
- रणदीप सुरजेवाला, काँग्रेस प्रवक्ते

काँग्रेसची मागणी; मोदींनी मौन सोडावे

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांना पदावरून हटवून, त्यांचे सुपुत्र जय शहा यांच्या कंपनीची उलाढाल अल्प कालावधीत कशी वाढली, याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी आज काँग्रेसने केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याविषयी आपले मौन सोडावे, असे काँग्रेस नेते आनंद शर्मा दिल्लीत बोलताना म्हणाले. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी काल (ता.9) जय शहा यांची पाठराखण केली होती. यावर बोलताना शर्मा यांनी ""ते मंत्री आहेत, प्रवक्ते आहेत की मॅनेजर'' असा टोला लगावला. पंतप्रधान मोदी प्रत्येक गोष्टीवर बोलतात. मग याविषयी का नाही. ज्याप्रमाणे लालकृष्ण अडवाणी, नितीन गडकरी यांनी आरोप झाल्यानंतर आपले राजीनामे दिले होते. त्याप्रमाणे अमित शहा यांनीही चौकशी पूर्ण होईपर्यंत आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, असेही शर्मा यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनीही जयपूर दौऱ्यात हा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, ""मोदींनी शहा यांना पदावरून दूर करावे. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या समितीमार्फत चौकशी करावी.''