हिवाळा संपेपर्यंत तणावाची धग कायम राहणार

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 जुलै 2017

डोकलाममधून माघार घेण्यास भारताचा नकार; सीमावादाचा आराखडा भारतास अनुकूल

डोकलाममधून माघार घेण्यास भारताचा नकार; सीमावादाचा आराखडा भारतास अनुकूल

नवी दिल्ली : सिक्कीममध्ये भारत आणि चीन यांच्यात निर्माण झालेला तणाव शिगेला पोचला असताना ही स्थिती हिवाळा संपेपर्यंत कायम राहण्याची शक्‍यता आहे. भारताने कोणत्याही परिस्थितीमध्ये माघार घेण्यास नकार दिल्याने चीनची कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सध्या तरी या लष्करी कुरघोडीमध्ये भारताने आघाडी घेतल्याचे चित्र आहे. सीमावादासंदर्भात 2005 मध्ये निश्‍चित करण्यात आलेल्या आराखड्यान्वये आपली बाजू योग्य असल्याचा दावा भारताने केला असून, तेव्हा निर्धारित करण्यात आलेल्या सीमेत कोणताही बदल केला जाऊ शकत नाही, असे भारताचे म्हणणे आहे. हा सीमाप्रश्‍न सोडविण्यासाठी विशेष प्रतिनिधींची सोय करण्यात आली असून, अंतिम तोडगा निघत नाही तोवर सीमेवर शांतता कायम ठेवण्याची जबाबदारी दोन्ही देशांची आहे. चीन आणि भूतानमध्येही 1998 मध्ये झालेल्या करारान्वयेही सीमावादावर कायमस्वरूपी तोडगा निघत नाही, तोवर "जैसे थी' स्थिती कायम ठेवण्याचे निर्धारित करण्यात आले होते.

भारताचे भूतानप्रेम
या ताज्या वादाबाबत "सेंटर फॉर चायना ऍनेलिसीस अँड स्ट्रॅटेजी' या संस्थेचे अध्यक्ष जयदेव रानडे म्हणाले की, "" चीन आणि भूतानने 1 जून रोजी एकत्रितपणे रस्त्याचे बांधकाम सुरू केले तेव्हा या दोन्ही देशांना भारताकडून विरोध होईल असे वाटले नव्हते. भारताने मात्र याला तीव्र आक्षेप घेत हे काम रोखल्याने दोन्ही देशांना धक्का बसला आहे. संरक्षण भागिदारीमध्ये भारत आणि भूतान हे जवळचे मित्र देश आहेत. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1958 मध्ये भूतानवरील आक्रमण हे भारतावरील आक्रमण समजले जाईल, अशी घोषणा केली होती.''

चीनचे धमकीसत्र
भूतानचे चीनसोबत तसे अधिकृत राजनैतिक संबंध नाहीत. अतिउंचावरील भाग म्हणून डोकलामला ओळखले जाते. येथे भारत आणि भूतान हे दोघेही महत्त्वाच्या स्थितीत आहेत. या भागास "डोका ला' हे नावदेखील भारतानेच दिले असून, पुढे भूताननेच ते "डोकलाम' असे केले. चीन मात्र या प्रदेशाला "डोंगलांग' असे म्हणतो. या कुरघोडीमध्ये भारत माघार घेत नसल्याचे लक्षात येताच चीनने त्यांच्या सरकारी माध्यमांद्वारे धमकवायला सुरवात केली आहे. चीनमधील आघाडीचे दैनिक "ग्लोबल टाइम्स' हे सरकारी मालकीचे वृत्तपत्र असल्याची बाब लपून राहिलेली नाही. भारत आणि चीन दरम्यानच्या सीमारेषेची लांबी ही 3 हजार 488 किलोमीटर एवढी असून, तिचा विस्तार जम्मू आणि काश्‍मीरपासून अरुणाचल प्रदेशापर्यंत आहे.