संसदेचे हिवाळी अधिवेशन 15 डिसेंबरपासून शक्‍य

संसदेचे हिवाळी अधिवेशन 15 डिसेंबरपासून शक्‍य

नवी दिल्ली: संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी सरकारी गोटातून 15 डिसेंबर ही प्रारंभाची तारीख पुढे आली असून, पाच जानेवारीला अधिवेशनाची समाप्ती होईल. अर्थात, याला औपचारिक दुजोरा मिळालेला नाही. मात्र निवडणूक आणि अधिवेशन एकाच वेळी नको, या सरकारच्या भूमिकेमुळे अधिवेशन डिसेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यातच होणार हे स्पष्ट झाले आहे.

संसदेचे हिवाळी अधिवेशन लांबल्यावरून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. संसदेच्या व्यासपीठावर वादग्रस्त मुद्दे उपस्थित केल्यानंतर त्यावर गुजरातमध्ये जाब द्यावा लागू नये म्हणून सरकारने अधिवेशन लांबविल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. अधिवेशनाच्या तारखांबाबत तर्क-वितर्क सुरू असून, आठवडा-दहा दिवसांचेच अधिवेशन होईल, असेही बोलले जात होते. मात्र, आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर 15 डिसेंबर ते 15 जानेवारी या दरम्यान संसदेचे हिवाळी अधिवेशन होणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्याला सरकारी पातळीवरून अद्याप दुजोरा देण्यात आली नाही. मात्र, अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज या मुद्द्यावर पत्रकारांशी बोलताना विधानसभा निवडणुकीच्या काळात अधिवेशन होणार नसल्याचे स्पष्ट सूचित केले.
ते म्हणाले, की लोकशाहीत निवडणुका सुरू असताना राजकीय पक्ष जनतेच्या दरबारात जातात. निवडणुका आणि संसद अधिवेशन एकाच वेळी होऊ नये. लोकसभा निवडणुकीच्या वेळी देखील अर्थसंकल्पी अधिवेशन मार्चच्या पहिल्या आठवड्यातच संपविले जाते. यापूर्वीही हिवाळी अधिवेशनाच्या तारखा बदलल्या असून, कालावधी कमी करण्याची परंपरा राहिली आहे. यंदाचे हिवाळी अधिवेशन पूर्ण कालावधीचे असेल; परंतु, निवडणुका आणि अधिवेशन एकाच वेळी असता कामा नये. गुजरातकडे भाजपचे सर्वाधिक लक्ष आहे. विरोधकांचे आहे की नाही याची कल्पना नाही. आम्ही गुजरातमध्ये प्रचारात व्यग्र आहोत, असेही जेटलींनी स्पष्ट केले.

अधिवेशनाचे वेळापत्रक किमान पंधरा दिवस आधी जाहीर केले जाते. गुजरातमध्ये दुसऱ्या टप्प्याचे मतदान 14 डिसेंबरला होणार असून साहजिकच 15 डिसेंबरपासून अधिवेशन सुरू होणार असल्यास घोषणा या महिन्याच्या अखेरीस होऊ शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com