गोपालकृष्ण गांधींची उमेदवारी वादाच्या भोवऱ्यात: संजय राऊत

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 जुलै 2017

1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनच्या फाशीला विरोध करणाऱ्या गोपालकृष्ण गांधी यांना मतदान करणार काय? मी प्रश्‍न विचारतो, की सोनिया गांधीजी उपराष्ट्रपतिपदासाठी आपण गोपालकृष्ण गांधी यांना कोणत्या आधारावर उमेदवारी दिली?
- संजय राऊत, शिवसेना नेते

याकूबच्या फाशीला विरोध करणाऱ्यांना उमेदवारी कोणत्या आधारावर?

नवी दिल्ली : महात्मा गांधी यांचे नातू गोपालकृष्ण गांधी यांची उमेदवारी वादात भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गांधी यांच्या उमेदवारीस आक्षेप घेत दहशतवादी याकूब मेमन याच्या फाशीच्या शिक्षेला विरोध करणाऱ्यांना उमेदवारी कोणत्या आधारावर दिली, असा सवाल कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना केला आहे. गोपालकृष्ण गांधी यांची भूमिका देशद्रोही असताना सोनिया गांधी यांनी त्यांचे नाव पुढे केले, अशा शब्दांत राऊत यांनी टीका केली आहे.

विरोधी पक्षांकडून उपराष्ट्रपतिपदासाठी उमेदवार म्हणून महात्मा गांधी यांचे नातू गोपालकृष्ण गांधी यांचे नाव जाहीर केले आहे. जदयूसहित अनेक विरोधी पक्षांनी गोपालकृष्ण गांधी यांच्या नावाचे समर्थन केले आहे. मात्र, गांधी यांच्या उमेदवारीला विरोध केला जात आहे. खासदार संजय राऊत यांनी गांधी यांच्या उमेदवारीवरून कॉंग्रेसवर टीका केली आहे. कॉंग्रेस पक्ष भारतविरोधी विचारसरणीला प्रोत्साहन देत असल्याचे राऊत म्हणाले. 29 जुलै 2015 रोजी गोपालकृष्ण गांधी यांनी दहशतवादी याकूब मेमनच्या फेटाळून लावलेल्या दया याचिकेवर पुन्हा विचार करावा यासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना पत्र लिहिले होते. संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर कॉंग्रेस अडचणीत येण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. गांधी यांना उमेदवारी जाहीर करून एक आठवडा लोटलेला असताना आता मुद्दा उपस्थित केला जात आहे.