हार्दिक पटेलच्या रॅलीस नितीशकुमारांची दांडी

उज्ज्वलकुमार : सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 12 जानेवारी 2017

पाटणा : संयुक्त जनता दलाचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे 28 जानेवारी रोजी गुजरातमध्ये पाटीदारांचा नेता हार्दिक पटेलने आयोजित केलेल्या रॅलीमध्ये सहभागी होणार नाहीत. तशी अधिकृत माहिती हार्दिकलाही कळविण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशातील प्रचारामध्ये नितीशकुमार हे सहभागी होणार असल्याने त्यांना गुजरातमध्ये जाणे शक्‍य होणार नसल्याचे समजते. दरम्यान, नितीश यांच्या या यूटर्नमागेही मोठे राजकारण असल्याचे बोलले जाते. मध्यंतरी प्रकाशपर्वच्या निमित्ताने मोदी आणि नितीश हे दोघेही एकत्र आले होते. नितीश यांनी आता केंद्र सरकारबाबतदेखील मवाळ भूमिका घेतली असल्याने ते हार्दिक यांना जाणीवपूर्वक टाळत असल्याचे एका नेत्याने सांगितले.

पाटीदार नेता हार्दिक पटेल याने "मोदी हराओ, देश बचाओ अशी हाक' देत एका मोठ्या रॅलीचे आयोजन केले होते, या रॅलीमध्ये नितीशकुमार यांनी सहभागी व्हावे म्हणून त्याने मध्यंतरी त्यांची भेटही घेतली होती. अखेर त्याचा हा प्रयत्नदेखील निष्फळ ठरल्याचे दिसून येते. दरम्यान, संयुक्त जनता दलाचे नेते के. सी. त्यागी माध्यमांशी बोलताना म्हणाले, की, हार्दिक यांनी 11 मार्चनंतर या रॅलीचे आयोजन केल्यास नितीश त्यात सहभागी होतील.''