"मला राजीनामा का मागितला नाही? नितीश यांनी बिहारचा अपमान केला"

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 जुलै 2017

नितीश यांनी सांगितले असते तर मी राजीनामा देण्याचा विचार केला असता. त्यांनी राजीनामा मागण्याची हिंमत का दाखवली नाही, असा सवालही तेजस्वी यांनी यावेळी केला. 

पाटणा : "नितीशकुमार यांनी भाजपसोबत हातमिळवणी फसवणूक केली असून, बिहारच्या जनतेचा अपमान केला आहे," अशी टीका तेजस्वी यादव यांनी केली. दरम्यान, मी राजीनामा दिला असता असे सांगतानाच तेजस्वी यांनी नवे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांच्याच विधानाचा दाखला देत नितीश यांनी आतापर्यंत सहावेळा असे केल्याचे सांगितले.

तेजस्वी यांनी सुशीलकुमार मोदी यांचे एक जुने विधान रिट्विट करत नितीश आणि भाजपच्या या राजकीय खेळीवर शाब्दिक कोटी केली.
"नैतिकतेचे कारण देत राजीनामा द्यायचा आणि काही महिन्यांतच पुन्हा सरकारमध्ये सहभागी व्हायचे ही नितीशकुमार यांची जुनी सवय आहे," असे सुशीलकुमार मोदी यांनी फेब्रुवारी 2015 मध्ये ट्विट केले होते.
ते रिट्विट करत तेजस्वी म्हणाले, "अगदी बरोबर. यावेळी नितीश यांनी काही मिनिटांतच हे केलंय. गेल्या बारा वर्षांत नितीश यांनी सहावेळा असे केले आहे."

नितीश कुमार यांनी मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावाच्या पार्श्वभूमीवर तेजस्वी यांनी बिहार विधानसभेत आणि नंतर बाहेर माध्यमांशी बोलताना नितीश यांच्यावर टीका केली. आज मी विधानसभेत अनेक प्रश्न उपस्थित केले. परंतु, भाजप आणि नितीश कुमार यांच्याकडे त्या प्रश्नांची उत्तरे नव्हती, असे तेजस्वी यांनी सांगितले. 

राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा असलेल्या लालुप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी हे बिहारचे उपमुख्यमंत्री होते. मात्र केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) त्यांच्याविरोधात एका गैरव्यवहार प्रकरणी चौकशी सुरू केल्यानंतर राजद व नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलामधील संघर्ष वाढत गेला.

नितीश यांनी सांगितले असते तर मी राजीनामा देण्याचा विचार केला असता. त्यांनी राजीनामा मागण्याची हिंमत का दाखवली नाही, असा सवालही तेजस्वी यांनी यावेळी केला.