आफरीनविरुद्ध 46 मौलवींचा फतवा; 'ती' निर्णयावर ठाम!

टीम ई सकाळ
बुधवार, 15 मार्च 2017

"माझे गायन हे देवाची देणगी आहे. त्याचा योग्य तो उपयोग केला पाहिजे. तसे न केल्यास ते देवाकडे दुर्लक्ष केल्यासारखे आहे," असे आफरीने म्हटले आहे. 

नवी दिल्ली : एका कन्नड कार्यक्रमात हिंदू भक्तीगीते गायल्याबद्दल 16 वर्षीय गायिका नाहिद आफरीन हिला सोशल मीडियावर लक्ष्य करण्यात आल्यानंतर आता आसाममधील 46 मौलवींनी तिच्याविरोधात फतवा काढला आहे. दरम्यान, आपण असल्या धमक्यांना घाबरत नसल्याचे तिने म्हटले आहे. 

शरिया कायद्याचा दाखला देऊन तब्बल 46 मौलवींनी आफरीनच्या सार्वजनिक व्यासपीठावर गाण्यावर बंदी घातली आहे. आसाममधील लंका, होजाई अशा काही भागांमध्ये 46 विविध व्यक्ती, संस्थांची नावे असलेली भित्तीपत्रके आढळून आली. या भागांमध्ये नाहिद आफरीन ही 25 मार्चला एका संगीत मैफलीत सहभागी होणार आहे. 

आफरीन म्हणाली, "फतव्यांमुळे सुरवातीला आतून मी एकदम कोसळले, परंतु मी संगीत सोडू नये म्हणून अनेक मुस्लिम गायकांनी मला धीर दिला, त्यामुळे मी तसे कधीही करणार नाही."
"माझे गायन हे देवाची देणगी आहे. त्याचा योग्य तो उपयोग केला पाहिजे. तसे न केल्यास ते देवाकडे दुर्लक्ष केल्यासारखे आहे," असे तिने म्हटले आहे. 

आसामच्या मुख्यमंत्री सरबनंदा सोनोवाल यांनी आफरीन हिच्याशी फोनवरून संपर्क करून तिला सुरक्षा पुरविण्याचे आश्वासन दिले. नाहिदने अलीकडे इसिस व इतर संघटनांच्या दहशतवादाविरोधात गाणी गायली होती. त्यावर प्रतिक्रिया म्हणून तिच्याविरोधात हा फतवा काढण्यात आला आहे काय याचा तपास करीत आहेत.