2019 च्या शर्यतीत मी नाही - नितीश कुमार

वृत्तसंस्था
सोमवार, 15 मे 2017

माझ्याबाबत वैयक्तिक महत्वाकांक्षा ठेवून वेगवेगळी वक्तव्ये केली जातात. मला हे पद मिळविण्यात काहीही रस नाही. शरद यादव हे जनता दल युनायटेड (जदयू) अध्यक्षपद स्वतःकडे कायम ठेवू शकत नसल्याने मी अध्यक्षपद स्वीकारले.

पाटणा - लोकसभेच्या 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपसमोर महाआघाडीचा पर्याय देण्याची चर्चा सुरु असताना, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 2019 मध्ये पंतप्रधानपदाच्या शर्यतीत मी नसल्याचे स्पष्ट केले आहे.

पाटणा येथे एका कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या नितीश कुमार यांना पत्रकारांऩी पंतप्रधानपदाच्या उमेदवारीबाबत विचारले असता त्यांनी हे उत्तर दिले. मी एवढा पण मूर्ख नाही आणि 2019 मध्ये पंतप्रधानपदाचा दावेदारही नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

नितीश कुमार म्हणाले, की माझ्याबाबत वैयक्तिक महत्वाकांक्षा ठेवून वेगवेगळी वक्तव्ये केली जातात. मला हे पद मिळविण्यात काहीही रस नाही. शरद यादव हे जनता दल युनायटेड (जदयू) अध्यक्षपद स्वतःकडे कायम ठेवू शकत नसल्याने मी अध्यक्षपद स्वीकारले. या निर्णयाने माझ्याकडे राष्ट्रीय राजकारणातील भविष्य म्हणून पाहिले जात आहे. तरीही माझ्यात पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून पाहणाऱ्यांचे मी आभार मानतो. या पदाचा उमेदवार कोण असेल, हे आताच सांगू शकत नाही.