जपानबरोबर लवकरच आण्विक सहकार्य करार

यूएनआय
शनिवार, 5 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - भारत आणि जपान यांच्या दरम्यान ऐतिहासिक द्विपक्षीय आण्विक सहकार्य करार होण्यासाठी सर्व सिद्धता झाली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जपान दौऱ्यादरम्यान या करारावर स्वाक्षरी होणार आहे. मोदी हे 11 आणि 12 नोव्हेंबरला जपान दौऱ्यावर असून, या वेळी ते जपानचे पंतप्रधान शिंझो ऍबे यांची भेट घेतील.

जपानबरोबर गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीमध्ये आण्विक सहकार्य कराराबाबत सर्व चर्चा पूर्ण झाली होती. त्यानंतर दोन्ही देशांनी या कराराच्या अंमलबजावणीसाठी आवश्‍यक असणारी सर्व कायदेशीर आणि तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केली असल्याचे परराष्ट्र मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले. या कराराचा मसुदा दोन्ही देशांनी मंजूर केला आहे. या प्रस्तावित करारानुसार, भारतातील ऊर्जेची गरज भागविण्यासाठी येथे हलक्‍या पाण्यावर आधारित अणुभट्ट्यांच्या माध्यमातून नागरी अणुऊर्जेचा विस्तार करण्याचे मान्य करण्यात आले आहे.

मोदी आणि ऍबे यांची पुढील आठवड्यात होणारी भेट ही दोन्ही नेत्यांमधील तिसरी भेट असेल. या दौऱ्यादरम्यान मोदी जपानच्या सम्राटांचीही भेट घेतील. मोदी यांनी पंतप्रधान म्हणून सप्टेंबर 2014 मध्ये जपानचा दौरा करत भारत-जपान सहकार्य वरच्या पातळीवर नेले होते. हे संबंध अधिक सुधारण्यासाठी हे दोघेही आगामी भेटीत प्रयत्न करतील, असे सूत्रांनी सांगितले.