पाकच्या गोळीबारात दोन नागरिक ठार; तीन जखमी

वृत्तसंस्था
शनिवार, 13 मे 2017

जम्मू-काश्‍मिरमधील राजौरी येथील नौशेरा येथे पाकने आज (शनिवार) केलेल्या गोळीबारात दोन नागरिकांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत.

जम्मू - जम्मू-काश्‍मिरमधील राजौरी येथील नौशेरा येथे पाकने आज (शनिवार) केलेल्या गोळीबारात दोन नागरिकांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत.

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे सुरूच असून आज (शनिवार) सलग तिसऱ्या दिवशीही हा प्रकार सुरूच राहिला आहे. याबाबत एका लष्करी अधिकाऱ्याने माहिती दिली. राजौरीतील नौशाला सेक्‍टरमध्ये आज सकाळी सव्वा सात वाजल्यापासून पाककडून गोळीबार करण्यात येत आहे. "पाकिस्तानच्या लष्कराने आज सकाळपासून अंदाधुंद गोळीबार सुरू आहे. त्यासाठी लहान आणि स्वयंचलित शस्त्रे, 82 मिमी आणि 120 मिमीच्या तोफांचा वापर करण्यात येत आहे', अशी माहिती लष्करी अधिकाऱ्याने दिली. दरम्यान भारतानेही चोख प्रत्युत्तर देण्यास सुरूवात केली आहे. सध्या दोन्ही बाजूंकडून गोळीबार सुरूच आहे. पाकने केलेल्या गोळीबारात आज दोन नागरिकांचा मृत्यू झाला. तर तीन जण जखमी झाले आहेत.

नौशाला सेक्‍टरमध्येच गुरुवारी झालेल्या गोळीबारामुळे पाकिस्तानच्या लष्करातील दोन जण जखमी झाले होते. तर पाककडून झालेल्या गोळीबारात एक महिलेचा मृत्यू झाला होता. तर तिचा पती जखमी झाला आहे.