पाकिस्तानची भेट राजकीय नाही : नवज्योतसिंग सिद्धू 

Pakistan visit is not a political : Navjot Singh Sidhu
Pakistan visit is not a political : Navjot Singh Sidhu

चंडीगड (पीटीआय) : पाकिस्तानला राजकीय हेतूने नाही, तर मित्राच्या निमंत्रणावरून गेलो होतो, असे स्पष्टीकरण आज पंजाब मंत्रिमंडळातील मंत्री आणि माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांनी केले. पाकिस्तानचे नवे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी गेलेले नवज्योतसिंग सिद्धू यांची पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांच्याशी गळाभेट वादग्रस्त ठरली आहे. दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सिद्धूची पाठराखण केलेली असताना काश्‍मीर हा वादाचा मुद्दा असल्याचे म्हटले आहे. पत्रकार परिषदेच्या सुरवातीलाच सिद्धू म्हणाले, की माझा पाकिस्तानचा दौरा चर्चेचा मुद्दा बनला आहे. 

पाकिस्तानचा माझा दौरा राजकीय नव्हता. एका मित्राच्या निमंत्रणावरून आपण तेथे गेलो होतो. त्याने आयुष्यभर संघर्ष आणि कठोर मेहनत केली आहे. आज तो ज्या ठिकाणी पोचला आहे, तेथून तो कोट्यवधी लोकांचे नशीब बदलू शकतो. बाजवा भेटीबाबत सिद्धू म्हणाले, की शपथविधी सोहळ्यातच बाजवा यांची भेट झाली. मला पहिल्या रांगेत बसवले होते. मला पाहून ते उत्साहित झाले आणि ते म्हणाले, की पाकिस्तानातील करतारपूर साहिबसाठी भाविकांना रस्ता सुरू करण्याच्या प्रयत्नात आहोत, जेणेकरून गुरुनानक देव यांच्या 550 व्या प्रकाश दिवसानिमित्त भाविक त्यांचे दर्शन घेऊ शकतील. गुरुनानक देव यांनी आयुष्यातील 18 वर्षे करतारपूर साहिब येथे व्यतीत केली आहेत. त्यामुळे कोट्यवधी भाविक हे करतारपूर साहिबच्या दर्शनाच्या प्रतीक्षेत आहेत. बाजवा यांनी ही बाब सांगितल्यानंतर मी भाऊक झालो आणि त्याची परिणीती गळाभेटीत झाली. या छोटेखानी मुलाखतीनंतर बाजवा यांची नंतर भेट झाली नाही. गळाभेटीवरून होणाऱ्या टीकेवरून सिद्धू यांनी नाराजी व्यक्त केली. 

पाकिस्तान दौऱ्यावरून टीकेच्या गर्तेत अडकलेले नवज्योतसिंग सिद्धू यांच्या मदतीला पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान धावून आले. सिद्धू हे शांतिदूत बनून पाकिस्तानला आले होते, असे इम्रान खान यांनी ट्विट करून म्हटले आहे. शपथविधी सोहळ्यास आल्याबद्दल त्यांनी सिद्धूचे आभार मानले आहेत. सिद्धू हे शांतिदूत बनून आले होते. त्याचवेळी त्यांनी पाकिस्तानला भरभरून प्रेम दिले, असेही इम्रानने म्हटले आहे. जी मंडळी त्यांच्यावर टीका करत आहेत, ती भारतीय उपखंडातील शांततेत बाधा आणत आहेत. शांततेशिवाय आपण विकास करू शकत नाही. यानंतर पुढच्या ट्विटमध्ये मात्र इम्रान खान यांनी काश्‍मीर राग आळवला आहे. ते म्हणाले, की पुढे जाण्यासाठी भारत आणि पाकिस्तानला काश्‍मीरसह सर्व वाद हे चर्चेने सोडवायला हवेत. गरिबी मिटवण्यासाठी आणि उपखंडातील जीवनमान उंचावण्यासाठी सर्वांत चांगला रस्ता हा चर्चेचा आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com