भारतीय लष्कराने केल्या पाकच्या चौक्‍या उध्वस्त 

वृत्तसंस्था
मंगळवार, 23 मे 2017

भारतीय सीमारेषेचे रक्षण करण्यासाठी लष्कर पूर्ण सज्ज आणि सक्रिय आहे, हे दाखवून देण्यासाठीच्या योजनेचा हा एक भाग होता. 
- मेजर जनरल अशोक नरुला 

नवी दिल्ली : घुसखोरीला साह्य करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याच्या चौक्‍या उध्वस्त करत भारतीय लष्कराने पाकिस्तानला इशारा दिला. 'अगदी नुकत्याच' केलेल्या या कारवाईमध्ये काश्‍मीरमधील नौशेरा भागातील पाकिस्तानच्या चार चौक्‍या पूर्ण उध्वस्त झाल्या आहेत. भारतीय लष्कराने या कारवाईचा व्हिडिओही प्रसिद्ध केला आहे. 

'तापमानाचा पारा वाढू लागला आणि काश्‍मीरमधील बर्फ वितळू लागले, की पाकिस्तानमधून भारतात घुसखोरी सुरू होते. या घुसखोरीला तोंड देण्यासाठी आणि त्यांना निपटून काढण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज आहे,' असे विधान मेजर जनरल अशोक नरुला यांनी आज (मंगळवार) केले. या कारवाईची माहिती देण्यासाठी लष्कराने आज पत्रकार परिषद घेतली. 

काश्‍मीरमधील धगधगत्या वातावरणामध्ये तेल ओतण्यासाठी पाकिस्तानकडून घुसखोरीचा वापर होत असतो, असा नेहमीचा अनुभव आहे. काश्‍मीरमधील नौगाम भागातून भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नांत असलेल्या दहशतवाद्यांबरोबर भारतीय सुरक्षा दलांची शनिवारी चकमक झाली. यात तीन जवान हुतात्मा झाले, तर इतर चौघांचा मृत्यू झाला होता.