पाकच्या कुरापती सुरूच

पाकच्या कुरापती सुरूच

नवी दिल्ली - व्याप्त काश्‍मीरमधील दहशतवादी तळांवर भारताने केलेल्या लक्ष्याधारित हल्ल्यांमुळे (सर्जिकल स्ट्राइक) आणि सिंधू पाणीवाटप करारानुसार वाट्याला आलेल्या पाण्याचा पुरेपूर वापर करण्याचे सूतोवाच केल्यामुळे विचलित झालेल्या पाकिस्तानने आता नवी खुस्पटे काढण्यास सुरवात केली आहे. भारताच्या किशनगंगा जलविद्युत प्रकल्पावरील आपल्या हरकती ऐकण्यासाठी आंतरराष्ट्रीय लवाद नेमण्याची मागणी पाकिस्तानने जागतिक बॅंकेकडे केली आहे. उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर सध्या दोन देशांत तणाव निर्माण झाला आहे. त्यामध्ये पाकिस्तानच्या या कांगाव्याने भर पडणार आहे. 

जागतिक बॅंकेच्या साहाय्याने जम्मू आणि काश्‍मीरमध्ये किशनगंगा जलविद्युत प्रकल्प उभारला जात आहे. दोन देशांदरम्यान असलेल्या सिंधू पाणी करारातील तरतुदींनुसार या प्रकल्पाचा आराखडा नसल्याची हरकत पाकिस्तानने घेतली असल्याचे सूत्रांनी सांगितले. भारताने मात्र पाकिस्तानचा हा दावा खोडून काढला असून, सिंधू पाणी करारनुसारच या प्रकल्पाचा आराखडा असल्याचे स्पष्ट केले आहे. करारातील हा तांत्रिक मुद्दा असून, या प्रकरणी तटस्थ तज्ज्ञ निरीक्षक नेमावा, असे आवाहनही भारताने जागतिक बॅंकेला केले आहे.

पाकिस्तानची मागणी लवादाची आहे, तर भारताची मागणी तटस्थ तज्ज्ञ नेमण्याची आहे. या करारातदेखील भारताच्या मागणीसारखीच तरतूद आहे. हा तांत्रिक क्‍लिष्ट विषय एखादा तज्ज्ञ अभियंता न्यायिक लवादापेक्षा योग्यरित्या समजावून घेऊ शकतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे. किशनगंगा प्रकल्पाबाबत भारत आणि पाकिस्तानने आपले म्हणणे व वस्तुस्थिती वॉशिंग्टन येथे जागतिक बॅंकेसमोर २७ सप्टेंबर रोजी स्वतंत्रपणे मांडली आहे.

सिंधू पाणी करारात कोणताही प्रकल्प कसा उभारावयाचा, याचा आराखडा निश्‍चित करण्यात आला आहे. पाकिस्तानने भारताच्या या आराखड्याला हरकत घेतलेली आहे. आमच्या म्हणण्यानुसार आराखडा योग्य आहे. मात्र, पाकिस्तानचे म्हणणे त्याच्या नेमके उलट आहे. त्यांच्या मते या आराखड्यामुळे पाकिस्तानात वाहणाऱ्या झेलम नदीच्या प्रवाहावर परिणाम होणार आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले. 

झेलम खोऱ्यातील या पाणी वादाविषयी पाकिस्तानने २०१० मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायिक लवादाकडेही दाद मागितली होती. किशनगंगा प्रकल्पाचे काम २००७ मध्ये सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पाच्या वीजनिर्मिती क्षमतेवरदेखील पाकिस्तानने आक्षेप घेतला होता. मात्र, २०१३ मध्ये पाकिस्तानचे आक्षेप फेटाळण्यात आले आणि भारताच्या बाजूने हा निकाल लागला. 

पाकिस्तानच्या या आक्षेपाचा उरी येथील दहशतवादी हल्ल्याशी काही संबंध नसल्याचे मानले जाते. कारण हा हल्ला होण्यापूर्वी व त्याला भारताने प्रत्युत्तर देण्यापूर्वीच वॉशिंग्टन येथील बैठकीची तारीख निश्‍चित झालेली होती.

कामावर परिणाम नाही 
किशनगंगा प्रकल्पाची क्षमता ३६० मेगावॉट वीजनिर्मितीची आहे. या प्रकल्पात किशनगंगा नदीचे पाणी झेलम नदीच्या खोऱ्यातील वीज प्रकल्पात वळविण्यात येत आहे. पाकिस्तानने हा नवीन वाद निर्माण केला असला तरी याचा परिणाम प्रकल्पाच्या कामावर होणार नाही असे मानले जाते. या संदर्भात कोणाची हरकत असली तरी काम थांबवण्याची गरज नाही. वादावर तोडगा निघेपर्यंत काम थांबवावे, असे करारात कोठेही म्हटलेले नसल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे भारत या जलविद्युत प्रकल्पाचे काम सुरू ठेवू शकतो.
 

किशनगंगा वीजनिर्मिती प्रकल्प

- ठिकाण - बंदीपूरपासून तीन किलोमीटर
- वीजनिर्मिती क्षमता - ३६० मेगावॉट
- काम सुरू - २००७
- उंची - १२१ फूट
- खर्च - सुमारे ५७८३ कोटी रुपये
 

दहशतवाद्यांनी हिसकावल्या बंदुका
जम्मू - सीमा सुरक्षा दल आणि बारामुल्ला येथील तळावर हल्ला केल्यानंतर आता दहशतवाद्यांनी सामनू गावातील पोलिस पार्टीवर हल्ला करत त्यांच्या पाच स्वयंचलित रायफल्स हिसकावून पळ काढल्याची घटना उघडकीस आली आहे. अत्यंत कमी संख्या असलेला हा पोलिसांचा गट कमी वस्ती असलेल्या एका परिसरात तैनात होता. त्या वेळी त्यांच्या पाच रायफल्स हिसकावून दहशतवाद्यांनी पळ काढला. या घटनेमध्ये कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

चंदू चव्हाणांबाबत पाकशी संपर्क
नवी दिल्ली - नियंत्रणरेषा ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत गेलेले भारतीय जवान चंदू चव्हाण यांच्या सुटकेसंदर्भात भारतीय लष्कराच्या मोहिमेच्या महासंचालकांनी (डीजीएमओ) पाकिस्तानच्या डीजीएमओंशी हॉटलाइनवरून संपर्क साधला. उरी हल्ल्यानंतर दुसऱ्यांदा हॉटलाइनवरून संपर्क साधण्यात आला आहे. दरम्यान, लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संदेश मिळाल्याचे निश्‍चित झाल्यानंतरही पाकिस्तानकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

तणाव कमी करण्याच्या हालचाली
इस्लामाबाद - भारत आणि पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी (एनएसए) दूरध्वनीवरून चर्चा करताना नियंत्रणरेषेवरील तणाव कमी करण्यावर सहमती दर्शविली असल्याची माहिती पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे परराष्ट्र धोरणविषयक सल्लागार सरताज अझीझ यांनी आज दिली. 

उरीमधील भारतीय लष्करी तळावरील दहशतवादी हल्ला आणि नियंत्रणरेषेपलीकडील दहशतवादी अड्ड्यांवर भारताने केलेल्या लक्ष्यवेधी हल्ल्यानंतर (सर्जिकल स्ट्राइक) दोन्ही देशांमधील तणाव वाढला असल्यामुळे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नासीर जंजुआ यांनी दूरध्वनीद्वारे चर्चा केली आणि नियंत्रणरेषेवरील तणाव कमी करण्याविषयी त्यांच्यात एकमत झाल्याचे अझीझ यांनी सांगितले. 

‘जियो न्यूज’ने अझीझ यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे, की पाकिस्तान नियंत्रणरेषेवरील तणाव कमी करण्यास इच्छुक असून, त्यांना पाकिस्तानवर लक्ष केंद्रित करायचे आहे. भारत तणाव वाढवून काश्‍मीर मुद्यावरून जगाचे लक्ष विचलित करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. 

नवाज शरीफ यांच्या अलीकडेच झालेल्या अमेरिका दौऱ्याविषयी अझीझ म्हणाले, की जोपर्यंत काश्‍मीरचा वाद मिटत नाही, तोपर्यंत दोन्ही देशांच्या सीमेवरील तणाव कायम राहील, असे पंतप्रधानांनी जागतिक नेत्यांना सांगितले आहे.

भारताला रशियाचा पाठिंबा
नवी दिल्ली - पाकिस्तानव्याप्त काश्‍मीरमध्ये घुसून भारताने दहशतवादी तळांवर केलेल्या लक्ष्यवेधी हल्ल्यांच्या (सर्जिकल स्ट्राइक) कृतीला रशियाने खुला आणि पूर्ण पाठिंबा दिला आहे. स्वसंरक्षणाचा हक्क प्रत्येक देशाला असल्याचे सांगत रशियाने भारताच्या कारवाईचे समर्थन केले आहे. सर्जिकल स्ट्राइकचे आम्ही स्वागत करतो, असे रशियाचे भारतातील राजदूत अलेक्‍झांडर कदाकिन यांनी स्पष्ट केले.

पाककडून पुन्हा शस्त्रसंधीचा भंग
जम्मू - शस्त्रसंधीचा पुन्हा भंग करताना पाकिस्तानी सैनिकांनी आज जम्मू-काश्‍मीरच्या पूँच जिल्ह्यात नियंत्रणरेषेजवळील नागरी भागात गोळीबार केला. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले, की आज सकाळी अंदाजे १०.४५ वाजण्याच्या सुमारास गोळीबार सुरू झाला असून, तो अजूनही सुरूच आहे. यापूर्वी रात्री अंदाजे एक वाजण्याच्या सुमारासही पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार केला होता. गेल्या सोळा तासांत पाकिस्तानने तिसऱ्यांदा शस्त्रसंधीचा भंग केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com