मुख्यमंत्रिपदावर चिन्नम्मांची सावली

वॉल्टर स्कॉट
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

पलानीस्वामींसह 30 जणांचा शपथविधी

बहुमताची परीक्षाही द्यावी लागणार

शशिकला यांनी पनीरसेल्वम यांची पक्षातून हकालपट्टी केली असली, तरीसुद्धा त्यांच्या समर्थक आमदारांवर मात्र कारवाई करण्यात आलेली नाही. बहुमताच्या परीक्षेमध्ये पलानीस्वामी या आमदारांची मदत घेऊ शकतात.

चेन्नई : मागील दहा दिवसांपासून तमिळनाडूमध्ये सुरू असलेल्या सत्तासंघर्षातील पहिल्या टप्प्यात आज शशिकला गटाने आघाडी घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले. चिन्नम्मांचे निष्ठावंत के. पलानीस्वामी यांनी राजभवनात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. पलानीस्वामी यांच्यासह अन्य 30 मंत्र्यांचा शपथविधीही या वेळी पार पडला. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यानंतर चिन्नम्मांचे मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न भंगले होते. माजी मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांच्याप्रमाणेच पलानीस्वामी यांनीही महत्त्वाची खाती आपल्याकडे ठेवली आहेत.

पलानीस्वामी यांच्याकडे गृह आणि अर्थमंत्रालयाचा कार्यभार राहणार असून, सार्वजनिक बांधकाम, महामार्ग, लघू बंदरे ही पूर्वीची खातीही त्यांच्याकडे असतील. दरम्यान, शपथविधी आटोपल्यानंतर पलानीस्वामी यांनी मरिना बीचवरील जयललिता यांच्या स्मारकाला भेट दिली. अम्मांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी आमचा पक्ष विधिमंडळात बहुमत सिद्ध करेल, असा विश्‍वास व्यक्त केला. पलानीस्वामी यांच्या शपथविधीमुळे पनीरसेल्वम गटाला मोठा धक्का बसल्याचे बोलले जाते. "गोल्डन बे रिसॉर्ट'मध्ये बंदिस्त असलेले आमदार सुटका होताच पनीरसेल्वम यांना पाठिंबा देतील अशी आशा त्यांना होती; पण तीही फोल ठरली.

अग्निपरीक्षा बाकी
पलानीस्वामी यांना पंधरा दिवसांच्या अवधीमध्ये विधिमंडळामध्ये बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. 20 फेब्रुवारी रोजी राज्य विधिमंडळाचे कामकाज सुरू होणे अपेक्षित आहे. अण्णा द्रमुकचे आणखी आमदार फुटले नाहीत, तर पलानीस्वामी यांचे सिंहासन आणखी बळकट होईल. शशिकला यांनी पनीरसेल्वम यांची पक्षातून हकालपट्टी केली असली, तरीसुद्धा त्यांच्या समर्थक आमदारांवर मात्र कारवाई करण्यात आलेली नाही. बहुमताच्या परीक्षेमध्ये पलानीस्वामी या आमदारांची मदत घेऊ शकतात.