"काश्‍मीरसाठी नव्हे;इस्लामसाठी भारतावर दगडफेक करा'

वृत्तसंस्था
शुक्रवार, 17 मार्च 2017

या दगडफेकीमधून खऱ्या अर्थी इस्लामला मदत होणार आहे. काश्‍मीरमध्ये आम्ही इस्लामसाठीच संघर्ष करत आहोत आणि आम्हाला इस्लामसाठी बलिदान द्यावयाचे आहे

श्रीनगर - हिझबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा नवा म्होरक्‍या झाकीर रशीद भट उर्फ झाकीर मुसा याने काश्‍मिरी युवकांनी भारतीय सुरक्षा दलांवर "काश्‍मिरी राष्ट्रवादासाठी नव्हे; तर इस्लामसाठी' दगडफेक करावी, असे आवाहन केले आहे.

काश्‍मीरमध्ये भारतीय सुरक्षा दलवर तरुणांकडून होणारी दगडफेक ही "धर्मनिरपेक्ष' असून "काश्‍मीरच्या स्वातंत्र्यासाठी' केली जात असल्याचा दावा राज्यातील हुर्रियत कॉन्फरन्स या या फुटीरतावादी संघटनेकडून करण्यात आला आहे. मात्र मुसा याच्या या स्पष्ट आवाहनामुळे हुर्रियतचे पितळ उघडे पडले आहे. मुसा याने केलेल्या या आवाहनाचे चित्रीकरण सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहे.

"आपल्या दगडफेकीमधून केवळ एका संघटनेला मदत होते आहे, असा विचार करु नका. या दगडफेकीमधून खऱ्या अर्थी इस्लामला मदत होणार आहे. इस्लामच्या संरक्षणासाठी दगडफेक करा. आमच्या काश्‍मीरमध्ये एक दिवस आम्ही इस्लामचा ध्वज उभा करु. काश्‍मीरमध्ये आम्ही इस्लामसाठीच संघर्ष करत आहोत आणि आम्हाला इस्लामसाठी बलिदान द्यावयाचे आहे,'' असे मुसा याने म्हटले आहे.

हिझबुलचा म्होरक्‍या बुऱ्हान वनी याला गेल्या वर्षी भारतीय सुरक्षा दलांनी यमसदनी धाडल्यानंतर मुसा याने या संघटनेचे नेतृत्व स्वीकारले आहे. इस्लामिक स्टेट (इसिस) या जागतिक दहशतवादी संघटनेकडून करण्यात येत असलेल्या विखारी धर्मकेंद्रित प्रचाराचेच अनुकरण वनी याच्याकडून करण्यात आले होते. मुसा याच्याकडूनही अशा स्वरुपाच्या प्रचाराचीच नक्‍कल करण्यात येत आहे.

वनी याला ठार करण्यात आल्यानंतर काश्‍मीरमध्ये त्याचे संतप्त पडसाद उमटले होते. काश्‍मिरी युवकांनी भारतीय सुरक्षा दलांवर अनेक महिने दगडफेक केली होती. या दगडफेकीचे पर्यावसन संपूर्ण काश्‍मीर खोऱ्यामध्ये पेटलेल्या हिंसाचारामध्ये झाले होते. वनी याला ठार करण्यात आल्यानंतर पाकिस्तानकडूनही निषेध नोंदविण्यात आला होता. वनी हा काश्‍मीरच्या स्वातंत्र्यासाठी लढणारा योद्धा होता, असा कांगावा पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी जागतिक स्तरावर केला होता.

मात्र मुसा याच्या या नव्या व्हिडिओमधून, दहशतवाद्यांच्या लेखी काश्‍मीरमधील भारताविरोधातील संघर्ष हा काश्‍मीरच्या स्वातंत्र्यासाठी नसून इस्लामसाठी काफिरांविरोधातीलच संघर्ष असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

Web Title: pelt stones for Islam, says