भारतावर प्रेम करणारे राजन देशभक्तच - मोदी

पीटीआय
गुरुवार, 30 जून 2016

आरोप करणारे जे कोणीही माझ्या पक्षातील किंवा पक्षाबाहेरील असतील ते अयोग्य करताहेत. केवळ प्रसिद्धीकरिता आटापिटा करण्यापेक्षा देशासाठी काही चांगले करावे. लोकांनी कोणतेही वक्तव्य करताना जबाबदारीचे भान ठेवावे. कुणी स्वतःला व्यवस्थेपेक्षा मोठा समजत असेल, तर ते अयोग्य आहे. 
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

नवी दिल्ली - रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांना देशाविषयी आस्था आहे, ते देशावर प्रेम करतात. त्यांच्या देशभक्तीविषयी शंका घेण्याचे कारण नाही, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजन यांची पाठराखण करीत त्यांच्याच पक्षाचे सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केलेल्या आरोपांचा समाचार घेतला. 

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मोदी यांनी राजन यांच्यावर केलेले आरोप अयोग्य असल्याचेही नमूद केले. या मुलाखतीमध्ये मोदी यांनी स्वामी यांचा चांगलाच समाचार घेतला, तर राजन यांच्या कामाचे कौतुक केले. राजन यांच्या देशभक्तीविषयी तिळमात्रही शंका नाही. त्यांनी जगात कुठेही काम केले तरी ते देशासाठी सदैव तत्पर असतील, असे मोदी या वेळी म्हणाले. 

मोदी यांनी या वेळी सुब्रमण्यम स्वामी यांचे नाव न घेता अप्रत्यक्षरीत्या टीका केली. कोणीही व्यवस्थेपेक्षा मोठा होऊ शकत नाही. फक्त प्रसिद्धीसाठी जर कुणी उठसूट आरोप करीत असेल, तर ते योग्य नाही. विशेषतः व्यवस्थेमध्ये राहून व्यक्तिगत आरोप करणे नीतिमत्तेला धरून नसल्याचे स्पष्ट मत मोदी यांनी या वेळी व्यक्त केले. 

स्वामी फक्त राजन यांच्यावर आरोप करून थांबले नाहीत, तर त्यांनी सूटाबुटात मंत्री वेटरसारखे दिसतात, असा टोमणा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना मारला होता. 

लक्ष्मणरेषा कलाकार ठरविणार का? 
भारत-पाकिस्तान संबंधांविषयी मोदींनी स्पष्ट विचार मांडले. विशेषतः कलाकारांकडून दहशतवादी हल्ल्यांसंदर्भात होत असलेल्या टिपण्यांचा मोदींनी समाचार घेतला. भारत-पाकिस्तानदरम्यानच्या लक्ष्मणरेषेचा निर्णय राज्यकर्ते करणार की कलाकार असा प्रश्‍न विचारत त्यांनी कलाकारांना फटकारले. यासोबत सीमारेषेबाबत सदैव दक्ष असून, कधीही कमकुवत भूमिका घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच पाकिस्तानसोबत दहशतवाद्याच्या मुद्यावर होत असलेल्या द्विपक्षीय चर्चेचाही मोदींनी आवर्जून उल्लेख केला. तसेच दोन्ही देश या समस्येवर एकत्रित उपाययोजना करत असल्याचेही त्यांनी सांगितले.