रशियाशी संवेदनशील संरक्षण,उर्जा करार...

वृत्तसंस्था
शनिवार, 15 ऑक्टोबर 2016

संरक्षण क्षेत्रामधील या महत्त्वपूर्ण करारांखेरीज उर्जा क्षेत्रामधील करारांसही यावेळी मान्यता देण्यात आली. यामध्ये "एस्सार ऑईल‘ ही भारतीय कंपनी रॉसनेफ्ट या रशियन कंपनीकडून खरेदी केली जाण्यासंदर्भातील कराराचाही समावेश आहे.

गोवा - ब्रिक्‍स परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर रशिया व भारतामध्ये अनेक महत्त्वपूर्ण करार झाल्याची घोषणा आज (शनिवार) करण्यात आली. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन व भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिक्‍सच्या औपचारिक प्रारंभाआधी केलेल्या चर्चेनंतर ही घोषणा करण्यात आली. या चर्चेनंतर रशिया व भारताच्या वतीने एक संयुक्त निवेदनही प्रसिद्ध करण्यात आले. 

यानुसार, भारताने रशियाकडून "एस-400 ट्रायम्फ‘ ही अत्याधुनिक हवाई लक्ष्यभेदी क्षेपणास्त्र व्यवस्था खरेदी करण्याचा निर्णय घोषित केला. याचबरोबर, कामोव्ह या रशियन हेलिकॉप्टरच्या उत्पादनासाठी संयुक्तरित्या प्रकल्प सुरु करण्याच्या निर्णयाची घोषणाही यावेळी करण्यात आली. संरक्षण क्षेत्रामधील या महत्त्वपूर्ण करारांखेरीज उर्जा क्षेत्रामधील करारांसही यावेळी मान्यता देण्यात आली. यामध्ये "एस्सार ऑईल‘ ही भारतीय कंपनी रॉसनेफ्ट या रशियन कंपनीकडून खरेदी केली जाण्यासंदर्भातील कराराचाही समावेश आहे.

भारत व रशियामध्ये झालेल्या महत्त्वपूर्ण करारांची यादी पुढीलप्रमाणे :

 

1) शिक्षण आणि प्रशिक्षणासाठी सहकार्य 

2) भारतीय आणि रशियन रेल्वे विभाग यांच्यात सहकार्य करार   

3) वाहतूक सुविधा प्रणाली विकास, आंध्र प्रदेशात स्मार्ट सिटीसाठी सामंजस्य करार 

4) रॉसनेफ्ट आणि एस्सार ऑईलमध्ये झालेल्या यशस्वी कराराची घोषणा

5) नौकाबांधणी क्षेत्र विकासासाठी युनायटेड शिप-बिल्डिंग कॉर्पोरेशन आणि आंध्रप्रदेश इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट बोर्ड यांच्यात करार 

6) शहरी विकास आणि स्मार्ट सिटी प्रकल्पांसाठी सामंजस्य करार

7) 226 कामोव्ह हेलिकॉप्टर्सच्या खरेदीसाठी भागधारक करारावर सह्या 

8) रशियन स्पेस कॉर्पोरेशन आणि इस्रोमध्ये सहकार्य करार