आम्ही फेकलेला कचरा मोदींनी उचलला- राहुल गांधी

वृत्तसंस्था
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

'भ्रष्ट लोकांवर दबाव टाका आणि त्यांच्यावर कारवाई करा असे मी मुख्यमंत्री हरिश रावत यांना सांगितले आहे,' अशी माहिती राहुल गांधी यांनी 'रोड शो'दरम्यान दिली.

हरिद्वार : "आम्ही उत्तराखंडमधून कचरा बाहेर फेकला. मोदींनी तो कचरा उचलून भारतीय जनता पक्षात टाकला," अशा शब्दांत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपच्या पक्षप्रवेशांवर खरमरीत टीका केली. 

उत्तराखंड विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या रणधुमाळीत येथील मुख्यमंत्री हरीश रावत यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राहुल गांधी यांचा 'रोड शो' आणि सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. 

ते म्हणाले, "मोदी म्हणतात की ते भ्रष्टाचाराविरोधात लढत आहेत. परंतु उत्तराखंडमध्ये ज्या भ्रष्ट नेत्यांची आम्ही पक्षातून हकालपट्टी केली त्यांचीच मोदी गळाभेट घेत आहेत."

'भ्रष्ट लोकांवर दबाव टाका आणि त्यांच्यावर कारवाई करा असे मी मुख्यमंत्री हरिश रावत यांना सांगितले आहे,' अशी माहिती राहुल गांधी यांनी 'रोड शो'दरम्यान दिली.