'रोमिओविरोधी पथकाला कृष्णविरोधी म्हणण्याची हिंमत आहे का?'

वृत्तसंस्था
रविवार, 2 एप्रिल 2017

उत्तर प्रदेशमधील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने सत्तेत आल्यानंतर मुलींची छेड काढणाऱ्या रोमिओविरोधी पथकांची स्थापन केली आहे. मात्र,काही जणांनी "रोमिओविरोधी' या नावावर नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्‍वभूमीवर ज्येष्ठ विधीज्ञ प्रशांत भूषण यांनी "रोमिओविरोधी पथकाला कृष्णविरोधी पथक म्हणण्याची हिंमत आहे का?', असा प्रश्‍न विचारत टीका केली आहे.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने सत्तेत आल्यानंतर मुलींची छेड काढणाऱ्या रोमिओविरोधी पथकांची स्थापन केली आहे. मात्र,काही जणांनी "रोमिओविरोधी' या नावावर नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्‍वभूमीवर ज्येष्ठ विधीज्ञ प्रशांत भूषण यांनी "आदित्यनाथ यांच्यात रोमिओविरोधी पथकाला कृष्णविरोधी पथक म्हणण्याची हिंमत आहे का?', असा प्रश्‍न विचारत टीका केली आहे.

"रोमिओ केवळ एकाच मुलीवर प्रेम करतो. तर कृष्ण अनेक मुलींची छेड काढण्यात लोकप्रिय होता. या पथकाला (रोमिओविरोधी पथक) कृष्णविरोधी पथक म्हणण्याची हिंमत आदित्यनाथ यांच्याकडे आहे का?', असा प्रश्‍न प्रशांत भूषण यांनी ट्विटरद्वारे उपस्थित केला आहे. त्यानंतर भारतीय जनता पक्षाने भूषण यांना तातडीने उत्तर दिले आहे. "कृष्णाला समजून घेण्यासाठी कित्येक जन्म घ्यावे लागतील. किती सहजपणे कृष्णाला राजकारणातून ओढले आहे. दु:खद बाब आहे', असे प्रत्युत्तर देत भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी दिले आहे.

टीका होत असल्याचे पाहत प्रशांत भूषण यांनी आपल्या आणखी पुन्हा ट्‌विटरद्वारे खुलासा केला आहे. "रोमिओ (विरोधी) पथकाबाबतच्या माझ्या ट्‌विटचा विपर्यास करण्यात आला. मला असे म्हणायचे होते की, रोमिओ (विरोधी) पथक ज्या आधारावर म्हटले जाते त्या तर्कानुसार भगवान कृष्णही छेडछाड करणारेच ठरतात.'

रोमिओ हा लोकप्रिय नाटककार शेक्‍सपिअर यांच्या नाटकातील पात्र आहे. रोमिओ-ज्युलिएटची प्रेमकथा प्रेम आणि समर्पणासाठी जगभर लोकप्रिय असल्याचे म्हणत ट्विटरवर काही जणांनी उत्तर प्रदेशमध्ये मुलींची छेडछाड काढणाऱ्या पथकांना "रोमिओविरोधी पथक' संबोधण्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

Web Title: prashant bhushan objected name of anti romeo squad