कुलभूषण यांची फाशी म्हणजे पूर्वनियोजित हत्या - भारत

वृत्तसंस्था
सोमवार, 10 एप्रिल 2017

कायदा आणि न्यायाच्या मुलभूत नियमांना डावलून पाकिस्तानने एका भारतीय नागरिकाला फाशीची शिक्षा सुनाविली आहे. भारत सरकार आणि नागरिकांना ही पूर्वनियोजित हत्या वाटत आहे. कुलभूषण यांना फाशी झाल्यास ती हत्या ठरेल.

नवी दिल्ली - हेरगिरीच्या आरोपावरून फाशीची शिक्षा देण्यात आलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांची पाकिस्तानकडून पूर्वनियोजित हत्या होत असल्याची भूमिका भारताने व्यक्त केली आहे. या प्रकरणी पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बसित यांना समन्स बजाविण्यात आले आहे.

भारतीय उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कायदा आणि न्यायाच्या मुलभूत नियमांना डावलून पाकिस्तानने एका भारतीय नागरिकाला फाशीची शिक्षा सुनाविली आहे. भारत सरकार आणि नागरिकांना ही पूर्वनियोजित हत्या वाटत आहे. कुलभूषण यांना फाशी झाल्यास ती हत्या ठरेल. कुलभूषण यांच्याविरोधात ठोस पुरावा नाही. कुलभूषण यांना वकील देण्याची परवानागी देण्यात आली नाही. पाकिस्तानने कुलभूषण यांचे अपहरण केले होते. पाकिस्तानमधील भारतीय राजदूतांना कुलभूषण यांना भेटण्यासाठी पाककडे सतत मागणी करण्यात येत होती. पण, त्यांच्याकडून भेट घेऊ दिली जात नव्हती. 

जाधव यांना गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यात (2016) हेरगिरीच्या आरोपांतर्गत अटक करण्यात आली होती. जाधव हे भारतीय गुप्तचर संस्था असलेल्या रॉचे एजंट असल्याचा पाकचा आरोप आहे. पाकिस्तानमध्ये हिंसक कृत्ये करुन अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न जाधव यांनी केल्याचा दावाही पाकिस्तानकडून करण्यात आला होता. मात्र जाधव हे भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी असून आता त्यांचा भारतीय लष्कराशी काहीही संबंध नसल्याची भूमिका भारताकडून घेण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी, जाधव भारतीय नौदलाचे अधिकारी असल्याची "कबुली' देणारे चित्रीकरणही पाककडून प्रसिद्ध करण्यात आले होते.